वेब न्यूज : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांना नवा झटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या अनेक नवे नवे निर्णय राबवत आपल्या ग्राहकांना झटक्यावरती झटके देत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आता आपले मोबाईल वॉलेट बेस्ड ऍप एसबीआय बडी (SBI Buddy) 30 नोव्हेंबर 2018 पासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने आपल्या (www.sbi.co.in) या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. 2015 साली बँकेने अधिकृतरीत्या या ऍपचे अनावरण केले होते. आता हे ऍप बंद झाल्यानंतर या वॉलेटमध्ये ज्यांचे पैसे शिल्लक आहेत त्यांचे काय होणार, यासंदर्भात मात्र बँकेकडून काहीही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

विशेष म्हणजे बँकेतर्फे अजूनही ग्राहकांना या वॉलेटमधील पैसे काढण्यासंदर्भात कोणत्याही अधिकृत सूचना देण्यात आलेल्या नाहीत. सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या बँकिंग सिस्टीममध्ये सतत बदल करत आहे आणि त्यामुळे बँकेचे ग्राहक चांगलेच वैतागले आहेत. गेल्याच आठवड्यात अचानक बँकेने एक नोटिफिकेशन प्रसारित करून ग्राहकांना सूचना दिली की, ज्या ग्राहकांनी आपला मोबाईल नंबर आपल्या बँक खात्याशी जोडलेला नाही त्यांची इंटरनेट बँकिंगची सुविधा बंद केली जाणार आहे. या सगळ्या गदारोळात बँकेने आपल्या एटीएमद्वारे काढल्या जाणार्‍या कॅशवरतीदेखील कपातीची मर्यादा आणून अजूनच सावळा गोंधळ माजवून दिला आहे. त्यात आता बँक डिसेंबर 2018 च्या शेवटापर्यंत मॅग्नेटिक स्ट्रीपवाली कार्डदेखील बंद करण्याचे आपले टार्गेट असल्याचे सांगत आहे. आता या नव्या ‘वॉलेट बंद’च्या निर्णयानंतर बँक या SBI Buddy जागी SBI YONO हे नवे मोबाईल ऍप घेऊन येत आहे. यात इंटीग्रेटेड डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म SBI YONO ची सुरुवात असल्याचे मानले जात आहे. SBI ने रिलायन्स जियोबरोबर यासाठी हातमिळवणी केलेली आहे. माय जियो ऍपच्या मदतीने SBI आणि जियो पेमेंट बँकच्या मदतीने आता आर्थिक सेवा पुरवण्यात येणार आहेत.