
>>डॉ. नेहा सेठ<<
मस्त उबदार थंडी. आपले आजी-आजोबा थंडीचा आस्वाद घेण्यासाठी प्रभातफेरी घेतात. भलेही त्यांनी स्वेटर, मफलरसारखे गरम कपडे परिधान केले असेल तरी बऱ्याच जणांना ही थंडी सहन होत नाही. त्यातून मग उगीच काहीतरी विकार उद्भवत राहतात. पण वेळीच या मोसमात स्वतःची काळजी घेतली आणि सोपी पथ्यं पाळली तर आपले आजी-आजोबा खऱ्या अर्थाने थंडी Enjoy करतील.
थंडीतले आजार –
> हिवाळ्यात ताप, सर्दी, खोकला, सांधेदुखी, बद्धकोष्ठता, अस्थमा, त्वचेचे विकार हे आजार होण्याची शक्यता असते.
> ताप आल्यास दुर्लक्ष करू नये. रक्ताची आणि इतर चाचण्या त्वरित करून घ्याव्यात.
> मूठभर तुळशीच्ॊया पानांचा काढा घ्यावा. यामुळे सर्दी, खोकला ताप बरा होतो.
> सांधेदुखी असेल तर दुखणाऱ्या साध्यांना कोणतेही तेल चोळावे. आहारामध्ये तेल, तुपाचे प्रमाण वाढवावे.
> डोळ्यांची काळजी घ्यावी.
पाणी –
हिवाळ्यात तहान कमी लागत असली तरीही पाणी भरपूर प्यावे. आवड आणि प्रकृतीप्रमाणे माठातील थंड, गरम कसेही चालू शकते. पाण्यामुळे डिहाड्रेशन होणार नाही.
व्यायाम –
> आजी-आजोबांनी सकाळच्या वेळी शक्यतो घराबाहेर पडू नये. घरातल्या घरात शक्य होतील असे व्यायाम प्रकार करावेत. उबदार थंडीचा मनसोक्त आनंद घेता यावा याकरिता त्यांनी दिनचर्या आणि ऋतुचर्येच्या पालनाबरोबरच दवात फिरणे, पाण्याचे तुषार अंगावर घेणे, सतत पंख्याचा जोराचा वारा अंगावर घेणे, या गोष्टी टाळाव्यात.
> हिवाळ्यात झेपेल तेवढा व्यायाम करावा. सकाळी किंवा संध्याकाळी फिरायला जावे. शक्यतो सकाळी अंगाला तेल लावून व्यायाम करावा आणि नंतर अर्ध्या तासाने आंघोळ करावी.
उबदार कपडे –
> रात्री झोपताना मोजे घालावेत, मात्र अंथरुणाबाहेर पडताना ते काढावेत. कारण पडण्याची भीती असते.
> उन्हात फिरणार असाल तर डोकं झाकलं जाईल याची काळजी घ्या. कारण वाऱ्यामुळे डोकं जड होतं. दव्याच्या दमटपणाचाही डोक्याला त्रास होऊन सर्दी, पडसं, डोकेदुखी होऊ शकतं. त्यामुळे कानटोपी, स्कार्फ, मफलरने डोके झाकावे.
त्वचेची काळजी –
> आजी-आजोबांची त्वचा मुळातच कोरडी पडते. थंडीच्या दिवसांत हवेतील गारव्यामुळे ती जास्त कोरडी होऊ शकते. त्यामुळे त्वचाविकार होण्याची शक्यता असते. यासाठी दररोज त्वचेची काळजी घ्यावी.
> याकरिता सकाळ-संध्याकाळ मॉइश्चरायझर क्रीम लावावे.
> ओल्या अंगावर खोबरेल तेल किंवा जॉन्स बेबी ऑईल लावावे. त्यानंतर अंग पुसलं तरी चालेल.
> निदान ओल्या हातापायावर तरी लावावे. त्यानंतर पुसावे.
> हर्पिसप्रमाणे त्वचेवर कोणत्याही प्रकारचा आजार झाल्यास किंवा पुरळ वगैरे आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
> कडकडीत गरम दुधातून अर्धा चमचा घरगुती साजूक तूप घालून प्यावे. सकाळ-संध्याकाळ केव्हाही सोयीनुसार घेऊ शकता.
> या ऋतूत गरम पाण्याने स्नान करावे; परंतु ज्यांना नेहमी थंड पाण्याने आंघोळ करण्याची सवय आहे, त्यांनी या दिवसांत थंड पाण्याने स्नान केल्यास अपाय होत नाही.
> या ऋतूत आंघोळीपूर्वी नियमितपणे खोबरेल तेल, तीळ तेल, सरकीचे तेल, शेंगदाणा तेल, मोहरीचे तेल अंगाला लावावे. यामुळे थंडीमुळे त्वचा कोरडी होऊन खाज येणे, त्वचा, ओठ, पायांवर भेगा पडणे हे विकार होत नाहीत. खोबरेल तेल थंड, तर मोहरीचे तेल उष्ण असते.
आहार –
> शक्यतो उष्ण आहार घ्यावा. चिकन सूप, भाज्यांचे सूप प्यावेत.
> आहारात काळीमिरी, लवंग, दालचिनीचा वापर करावा. यामुळे घशाचे विकार होणार नाहीत.
> पुदिना घातलेला काढा घ्यावा. यामुळे श्वसनाचे विकार कमीतकमी होण्याची शक्यता आहे.
> तीळ, शेंगदाणे, खोबरे यांचा पथ्यानुसार आहारात समावेश करावा.




























































