
सामना ऑनलाईन,मुंबई
मध्य रेल्वेला सहा वातानुकूलित लोकल मिळणार असल्याने त्यांना कोणत्या मार्गावर चालवायचे यावर विचारविनिमय सुरू आहे. या वातानुकूलित लोकलला ज्यादा प्रवासी लाभण्यासाठी तिला जलद मार्गावरील थांबे देण्यापेक्षा धिम्या मार्गावर ती चालविण्यात यावी, असा विचार सुरू आहे.
मध्य रेल्वेवर या लोकलची मेनलाइनवर कल्याण ते सीएसटी स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर सुरुवात करण्याचा विचार सुरू आहे. या मार्गावर मुलुंड आणि मस्जिद येथे धिम्या थांब्यांवर एसी लोकलला व्यापारी लोकांचा ज्यादा प्रतिसाद मिळण्याची शक्यता पाहूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरही एसी लोकल चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गाडी लवकर पिक अप घेणार
सामान्य लोकलपेक्षा एसी लोकलला तिचे स्वयंचलित दरवाजे उघडझाप होण्याच्या क्रियेमुळे स्थानकावर ज्यादा वेळ थांबावे लागते, परंतु नव्या लोकलच्या मोटरची क्षमता अधिक असल्याने ही ट्रेन लवकर पिक अप घेऊन वेगाने स्थानकातून निघून जाईल. त्यामुळे तो वेळ कव्हर करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.






























































