
सामना ऑनलाईन, मुंबई
दहावीच्या परीक्षेला बसलेल्या आणि इंटरमिजीएट ही चित्रकला परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना वाढीव गुणांची सवलत देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. मात्र हे वाढीव गुण विद्यार्थ्यांना मिळणार की नाहीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. इंटरमिजीएट गुणांच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी शिक्षण मंडळाने 20 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. मात्र अद्याप इंटरमिजीएट परीक्षेचा निकालच शाळांकडे आलेला नसल्याने या विद्यार्थ्यांना वाढीव गुणांना मुकावे लागण्याची भीती वर्तवली जात आहे.
सप्टेंबर 2018 मध्ये इंटरमिजीएट परीक्षा पार पडली. 15 जानेवारीला या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. निकाल जाहीर झाल्यानंतर तो पोस्टाने परीक्षा केंद्राकडे येतो. त्यानंतर शाळांकडे येतो, मात्र अद्यापही अनेक शाळांना हा निकाल मिळालेला नाही. निकाल उशिरा लागत असेल तर शिक्षण मंडळाने दिलेल्या मुदतीत वाढीव गुणांचे प्रस्ताव कसे सादर करणार, असा प्रश्न असून ही समस्या दरवर्षीसाठीच होणार असल्याचे काही मुख्याध्यापकांनी निदर्शनास आणून दिले.
30 मार्चपर्यंत मुदत वाढवून द्या
इंटरमिजीएट परीक्षेच्या आधारे दहावीच्या परीक्षेत वाढीव गुणांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी 30 मार्चपर्यंत मुदत वाढवून द्या, अशी मागणी मुंबई माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेने केली असून या मागणीचे निवेदन मुंबई विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांना देण्यात आले आहे.
ऑनलाइन हॉल तिकिटासाठी शुल्क घेऊ नका
यंदापासून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन हॉलतिकिटे देण्यात येणार आहेत. ही हॉलतिकिटे शाळा आणि कॉलेजच्या माध्यमातून दिली जाणार आहेत. मात्र त्याचे शुल्क प्रत्येकी रुपये दहा हे शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांकडून घेतले आहे. जर ऑनलाइन हॉलतिकीट शाळा, कॉलेज पुरविणार असेल तर त्याचे शुल्क शिक्षण मंडळाने आकारू नये, अशी मागणी मुख्याध्यापक संघटनेचे प्रशांत रेडीज, शंकर पवार, रणजीत सुर्वे यांनी केली आहे.
































































