
सामना ऑनलाईन । प्रयागराज
आगामी लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात काँग्रेसने राममंदिराला पाठिंबा दिला तर विश्व हिंदू परिषद काँग्रेसला पाठिंबा देईल, असे विहिंपने आज जाहीर करून भाजपला झटका दिला आहे. कुंभमेळा भरलेल्या प्रयागराज येथे बोलताना विहिंपचे कार्याध्यक्ष अलोक कुमार म्हणाले, काँग्रेसने आमच्यासाठी सर्व दरवाजे बंद केले आहेत. पण त्यांनी दरवाजे उघडले अन् जाहीरनाम्यात राम मंदिराचा विषय घेतला तर आम्ही काँग्रेसला पाठिंबा देण्याचा विचार करू.
2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने राम मंदिर उभारण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनाची भाजपकडून अद्यापि पूर्तता होत नसल्याने विहिंपने राममंदिराच्या मुद्दय़ावर काँग्रेसला पाठिंबा देण्याचा केलेला विचार हा भाजपला एक झटका असल्याचे मानले जात आहे. येत्या 31 जानेवारी रोजी प्रयागराज येथे विहिंपची धर्मसंसद होत आहे. या धर्मसंसदेत राममंदिरासाठी कायदा करा असा दबाव मोदी सरकारवर आणला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच विहिंपने आज काँग्रेसला राममंदिराच्या मुद्दय़ावर चुचकारण्याचा केलेला प्रयत्न केल्याचे दिसत आहे.
धर्मसंसदेत आम्ही शंकाराचार्यांचे, साधूसंतांचे आशीर्वाद घेणार आहोत. त्यांच्यासमोर राममंदिराचा विषय मांडणार आहे. या विषयावर त्यांचा सल्ला घेऊन आम्ही आमचा पुढील मार्ग ठरविणार आहोत, असे कार्याध्यक्ष अलोक कुमार यांनी सांगितले. राममंदिराचा विषय हा सुप्रीम कोर्टात असल्याने या विषयावर अध्यादेश काढण्यात येणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच मुलाखतीत स्पष्ट केलेले आहे. याबाबत बोलताना अलोक कुमार म्हणाले, राममंदिराच्या विषयावर केंद्र सरकार आता अध्यादेश काढणार नाही असे दिसते. हे आम्ही शंकराचार्य, साधूसंतांना या धर्मसंसदेत सांगणार आहोत.
काँग्रेसच्या हृदयात राम येऊ द्या!
राममंदिराच्या विषयावर निवडणुकीनंतर सुनावणी घ्या, असे काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलेले आहे. अशा काँग्रेसच्या हृदयात प्रथमतः भगवान राम तर येऊ द्या, अशी उपरोधिक प्रतिक्रिया भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी व्यक्त केली आहे. आम्ही राममंदिराची उभारणी करण्यास वचनबद्ध आहोत, असेही त्यांनी सांगितले.
अलोक कुमार म्हणतात, वक्तव्याचा विपर्यास
आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलेला आहे, असे आता विंहिपचे अलोक कुमार हे म्हणत आहेत. अलीकडच्या काळात विहिंपने सर्व पक्षीय नेत्यांच्या भेटी घेतल्या. राममंदिर विषयावर संसदेत जेव्हा कायदा करण्याचा प्रस्ताव मांडला जाईल तेव्हा पाठिंबा द्या असे आवाहन या भेटीत या नेत्यांना विहिंपने केल्याचे अलोक कुमार यांनी सांगितले. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात राममंदिरास पाठिंबा दिला तर त्याचे स्वागत आहे. या पक्षाला पाठिंबाला देण्याचा विषयच येत नाही, असे अलोक कुमार यांनी सांगितले.


























































