एटीएम मशीन पळविण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। चाकण

चाकण शिक्रापूर रस्त्यावरील एच.डी.एफ.सी. बँकचे एटीएम मशीनच पळवून नेण्याचा भामट्यांनी प्रयत्न केला. ही घटना चाकण येथील विशाल गार्डन समोर चंद्र्श्री कॉम्प्लेक्स मध्ये मंगळवारी पहाटे घडली . संबंधित एटीएम मशीन पीकअप जीपला दोरीने बांधून उपसण्यात आले. सुमारे वीस मिनिटे हा प्रकार सुरू होता. मात्र सायरनचा आवाज सुरु झाल्याने चोरट्यांनी पळ काढला. ए.टी.एम मधील सीसीटीव्ही कॅमे-यात आपला चेहरा दिसू नये म्हणून आरोपींनी सुरुवातीलाच सीसीटीव्ही कॅमे-यावर स्प्रे मारले होते. त्यामुळे भामटे कोण होते हे अद्याप कळू शकलेले नाही.

एसजीएस कंपनीचे अधिकारी प्रकाश हिरामण पाटील ( 35, रा. वडगाव शेरी, ता. हवेली, पुणे) यांनी या बाबत चाकण पोलिसांत तक्रार दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून चार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसजीएस कंपनी एटीएम मशीन बनविण्याचे व एटीएम सेंटर मध्ये सुरक्षेसाठी सायरन सीसीटीव्ही बसवून निगराणीचे काम करते. फिर्यादी प्रकाश पाटील यांना मंगळवारी पहाटे तीनचे सुमारास एसजीएस कंपनीच्या मुंबई येथील मुख्यालयातून फोन आला कr, चाकण येथील एचडीएफसीच्या एटीएम सेंटर मध्ये काही संशयास्पद हालचाली सुरु आहेत. त्यानंतर पाटील यांनी तत्काळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलीस आणि फिर्यादी घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच चोरट्यांनी पोबारा केला होता. त्यानंतर सदरच्या ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले असता दिसून आले कि, एका पीकअप जीपने चौघे जण एटीएम सेंटर समोर आले. सर्वांनी आपले चेहरे रुमालाने बांधलेले होते. एटीएम सेंटरच्या बाहेरील आणि आतील सर्व सीसीटीव्ही कॅमे-यावर काळ्या रंगाचा स्प्रे त्यांनी मारला. त्यानंतर एटीएम सेंटरच्या बाहेर उभ्या करण्यात आलेल्या पीकअप जीपला दोरीच्या साह्याने एटीएम बांधले व उपसून काढण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान एटीएमसेंटर मधील सायरन मोठ्याने वाजू लागला. त्यामुळे चौघांनी घटनास्थळावरून धूम ठोकली. एटीएम मशीन उपसण्यात चोरट्यांना यश आले, मशीन उपसताना एटीएमचा समोरील भागही संपूर्णपणे फुटला मात्र त्यातील होल्ट सुरक्षित राहिल्याने आतील रक्कम शाबूत राहिली. चाकण पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.