
>> प्रभाकर पवार
पाऊणशे वयोमान असलेल्या श्रीमती सुनंदा दत्तू चांदोरकर या वृद्ध महिला आग्रीपाडा येथील बीआयटी चाळीत एकट्याच राहतात. जीवनावश्यक वस्तू संपल्याने त्या सकाळी अकराच्या सुमारास घरातून बाहेर पडल्या. जवळच्या फॅन्सी मार्केटमध्ये सामान खरेदी करण्यासाठी जात असतानाच झुला मैदान येथे या महिलेला सुमारे पंचविशीतील दोन तरुणांनी अडविले. ‘‘आजीबाई, पुढे गरीबांना साड्या व चपलांचे वाटप सुरू आहे. चला, आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जातो’’ अशी बतावणी त्या दोन तरुणांनी केली व निर्जन रस्त्यावर नेऊन त्या महिलेच्या अंगावरील (तिला बोलण्यात गुंतवून) सोन्याची चेन, मोबाईल इ. वस्तू ताब्यात घेतल्या आणि पसार झाले. प्रचंड धक्का बसलेल्या त्या महिलेने आग्रीपाडा पोलीस ठाण्यात झाल्या प्रकाराची तक्रार नोंदविली. महिला फौजदार यास्मिन मुल्ला यांनी ‘एफआयआर’ नोंदविला; परंतु आज दोन महिने लोटले तरी आरोपी काही पकडले गेले नाहीत. या व अशा असंख्य तक्रारी व गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून वृद्ध महिलांना मोठ्या प्रमाणात लक्ष्य करण्यात येत आहे.
प्रतिकार करणार नाहीत अशा (विशेषतः साठी ओलांडलेल्या) वृद्ध महिलांना हेरायचे आणि त्यांच्या जवळ जाऊन पुढे दंगल सुरू आहे, खून झाला आहे, पोलीस तपास सुरू आहे, लोक रस्त्यावर आले आहेत, पोलिसांचा लाठीचार्ज सुरू आहे अशी वेगवेगळी कारणे सांगून महिलांना थांबवायचे आणि त्यांच्या अंगावरील दागिने लंपास करून पळून जायचे अशा कार्यपद्धतीत अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ‘‘दागिने आपल्याकडील पिशवीत ठेवा’’ असा सल्लाही पोलीस असल्याचे भासवणारे हे भामटे त्या महिलेला कधी उल्लू बनवून पळून जातात ते कळतच नाही. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आल्यावर आरडाओरडा केला जातो. परंतु पोलीस ठाण्यात तक्रारदार पोहोचेपर्यंत आरोपींनी पोलीस ठाण्याची सीमा पार केलेली असते.
मंदिर, लग्नाचे हॉल, विविध सोहळे, सभा ज्या ठिकाणी असतात अशा ठिकाणी मोटरसायकलधारी भामटे फिल्डिंग लावतात. जैन मंदिराजवळ तर अंगावर दागिने घातलेल्या महिलांना मोठ्या प्रमाणात लुटले जाते. प्रतिकार करणार्या महिलांवर शस्त्रधारी भामटे जीवघेणा हल्लाही करतात. त्यामुळे अंगावर दागिने घालणे किंवा त्यांचे प्रदर्शन करणे सध्याच्या कलियुगात धोकादायक आहे हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. बरं, दागिने घरात ठेवले तर घरफोडीची भीती. मुंबईत तुमचे घर एक तास जरी बंद असले तरी ते फोडले जाते. घरातील सर्व किमती ऐवज पळविला जातो. म्हणजे घरातही दागिने ठेवायचे नाहीत आणि अंगावरही घालायचे नाहीत अशी सध्याची बिकट परिस्थिती आहे. मुंबईसारख्या बहुरंगी, बहुढंगी, अठरापगड जातींच्या या मुंबईत पदोपदी चोरलफंगे आहेत. प्रत्येक माणसावर त्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. कार पार्किंग करून तुम्ही ड्रायव्हर सीटवर बसलेले असाल तर पाठचा दरवाजा उघडून कधी ‘सीट’वरील बॅग किंवा तुमच्या किमती वस्तू पळविल्या जातील याचा नेम राहिलेला नाही. गाडी पार्क करून तुम्ही बाहेर पडलात तर तुमची गाडी तुम्ही परत आल्यावर शाबूत असेल याचीही खात्री नाही. मुंबईसारख्या शहरात आजही रोज सरासरी 15 ते 20 वाहने चोरीला जातात. रोज 10 ते 12 घरफोड्या केल्या जातात. चेन स्नॅचिंगचे प्रकार तर विचारू नका. आज महिलांना रस्त्यावरून फिरणे मुश्कील झाले आहे. हा झाला स्ट्रीट क्राइम! व्हाइट क्राइमची परिस्थिती तर याहून भयानक आहे.
फोनवर कुठल्या तरी बँकेतून बोलत असल्याचे सांगून वृद्धांकडून त्यांच्या बँक खात्याची, एटीएम, डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती घेऊन त्यांना आज लाखो रुपयांना गंडा घातला जात आहे. कुणीही घरच्या फोनवर किंवा मोबाईलवर बँक खात्याची किंवा एटीएम कार्डविषयक माहिती विचारली तर पासवर्ड, ओटीपी नंबर देऊ नका असे बँकांकडून वारंवार एसएमएसद्वारे बँक ग्राहकांना कळविले जाते. तरीही कॉल करणारा आपल्या मिठास वाणीने बँक ग्राहकांना, विशेषतः वृद्ध स्त्री-पुरुषांना गंडवतो, एटीएम कार्डद्वारे पैशांची लुटमार करतो. बरे, हे सारे भामटे आपल्या देशातीलच दिल्ली, नोएडा, यूपी, बिहार, उत्तरांचल आदी भागांतील आहेत. कुठेतरी भाड्याने एखादा गाळा घ्यायचा आणि आपल्या देशातील बँक खातेदार व एटीएमधारकांना गंडा घालायचा असे रोज सुरू आहे. लोक त्याला बळी पडत आहेत. अगदी पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांनाही फसविले जात आहे. तरीही यावर कुणीही गांभीर्याने विचार करताना दिसत नाही याचे आश्चर्य वाटते.
पुलवामा येथे लष्करी जवानांवर हल्ला करून 40 जणांचे बळी गेल्यानंतर पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केला जातो. मग मुंबई व महाराष्ट्रात येऊन लुटमार करणार्या, ऑनलाइन फसवणूक करणार्या भामट्यांचा दिल्ली, नोएडा, यूपी, बिहारमध्ये घुसून मुंबईचे पोलीस का नायनाट करीत नाहीत? मुंबईकरांची देशभरातून अशी किती दिवस फसवणूक केली जाणार आहे? आज वृद्ध स्त्री-पुरुषांना घरातून बाहेर पडणे किंवा एकाकी घरात राहणेही मुश्कील झाले आहे. कधी कोणता भामटा घरात घुसेल आणि घरातील किमती ऐवज पळविण्यासाठी जीवघेणा हल्ला करील ते सांगता येत नाही.
गेल्याच आठवड्यात माटुंगा येथील लेबर कॅम्प येथे श्रीमती वसंता नारायण अय्यर या 79 वर्षांच्या वृद्धेची हत्या करून 25 तोळे सोने पळविल्याची गंभीर घटना ताजी आहे. अशा घटना वारंवार घडत आहेत. चोरीच्या उद्देशाने वृद्धांना जीवे ठार मारले जात आहे. कधी कधी स्वतःची मुलंही प्रॉपर्टीसाठी आई-वडिलांचा काटा काढीत आहेत. वास्तविक उतारवयात मुलांचाच आई-वडिलांना आधार असतो, परंतु अलीकडील बरीच हृदयशून्य कार्टी बेइमान होत आहेत आणि जन्मदात्या आईवडिलांचा मालमत्तेसाठी खून करीत आहेत. त्यामुळेच एकाकी राहणार्या वृद्धांच्या घरी आठवड्यातून एकदा तरी स्थानिक पोलीस भेट देऊन त्यांची विचारपूस करीत असतात. अखेर वृद्धांना पोलिसांचाच खरा आधार वाटतो, पोटच्या पोरांचा नाही हेही समाजाने लक्षात घेतले पाहिजे. आणि त्यांना अडचणीच्या वेळी सहकार्य केले पाहिजे. आज सार्या विश्वात लहान मुले, महिला व वृद्ध असुरक्षित आहेत. शक्तिशाली, बलशाली अपप्रवृत्तींकडून त्यांचे शोषण केले जात आहे. त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तेव्हा ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवून आपले कर्तव्य बजावणार्या कर्तव्यकठोर पोलिसांनो आता तुम्हीच दुष्ट प्रवृत्तींचा नायनाट करा आणि आबालवृद्धांचे रक्षण करा.



























































