
- डॉ. विजया वाड
यशवंतराव चव्हाणांचे बहुरंगी आयुष्य कृष्णाकाठ मधून पारदर्शी होत जाते.
यशवंतरावांच्या वेळचा महाराष्ट्र कसा होता, राजकीय चळवळ कशा प्रकारे कार्यरत होती आणि कौटुंबिक सौख्याचा विचार न करता आपले आयुष्य स्वातंत्र्य चळवळीस वाहून देत काम करणाऱया इतर स्वातंत्र्यवीरांचीही झलक वाचावयास मिळते. यशवंतराव सक्रिय राजकारणात उतरले होते.
राजकारणात वेगवेगळे मतप्रवाह कसे होते, मानवेंद्र रॉय यांची मते काय होती, आमदार चंद्रोजी पाटील ऊर्फ कारभारी हे कसे सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांनी भारले होते, कामेरीचे के. डी. पाटील म्हणजे केशवराव यांचे राजकारणात यशवंतरावांना कसे सहकार्य लाभले, पहिल्या प्रतीचे वक्तृत्व असलेले तासगावचे तरुण विद्वान वकील विठ्ठलराव पागे यांच्या मैत्रीचा अध्याय, महात्मा गांधींच्या विचाराने प्रभावित झालेली ही सर्व तरुण मंडळी नि त्यांचे आपल्यापरी स्वातंत्र्यलढय़ाला योगदान या गोष्टी अत्यंत वाचनीय झाल्या आहेत. वाचताना देशप्रेम, महाराष्ट्रप्रेम उफाळून येते बघा. मी असेही म्हणेन की, हे वाचन इतिहासाचे जिवंत चित्र डोळय़ांसमोर उभे करते.
1940 मध्ये यशवंतरावांनी कायद्याच्या दुसऱया वर्षाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. ते अभ्यासात बुडून गेले. एप्रिलमध्ये परीक्षा झाली आणि ते मग पुणे सोडून कराडला परतले. कराडात वालचंद गांधी हे खादी भांडार चालवणारे एक कार्यकर्ते होते. वालचंद गांधींचे भाषण रविवार चौकात होते. त्यांनी यशवंतरावांनाही भाषण करण्यास बोलावले होते. त्यांनी युद्ध झाल्यापासून त्यांनी कशा कशा भूमिका घेतल्या आणि युद्धामध्ये कमीतकमी भाषण स्वातंत्र्याचा हक्क असावा ही महात्मा गांधींनी केलेली मागणी ब्रिटिश सत्तेने कशी नाकारली याची सर्व हकीकत सांगितली आणि मग यशवंतराव असेही म्हणाले की, ‘जेथे आम्हाला आमचे मनही बोलून दाखविण्याचा अधिकार नाही तेथे युद्धासाठी आमचे सहकार्य मागण्याचा अधिकार ब्रिटिश सरकारला कसा काय बुवा प्राप्त होतो?’ भाषण स्वातंत्र्य हा आमचा मूलभूत अधिकार असून तो बजावल्याखेरीज आम्ही स्वस्थ बसणारच नाही’ असेही ते म्हणाले.
यशवंतरावांना मंत्रीपद न देता पार्लमेंटरी सेक्रेटरी पद दिले ही गोष्ट त्यांना फारशी आवडली नव्हती. त्यांचे काम आणि त्यांची जाण या तुलनेत ते पद कमी आहे अशी त्यांची भावना होती. पण आई, नि पत्नी वेणूबाई यांच्या आग्रहास्तव ते ‘नाही’ म्हणाले नाहीत इतकेच. ते पुणेमार्गे मुंबईच्या वाटेला लागले.
गाडीत बसल्यावर मनात विचारांचे काहुर उठले. असे वाटले की त्यांच्या जीवनात मोठा बदल झाला आहे. कृष्णाकाठी ते वाढले, हिंडले, फिरले, झगडले, अनेक नवी कामे केली. मैत्री केली, माणसे जोडली, मोठा आनंदाचा आणि अभिमानाचा काळ मिळाला. आता नवी रंगीबेरंगी क्षितिजे खुणावत होती, पण भविष्य अज्ञात होते. अशा विचारांच्या तंद्रीत असताना रावसाहेब मधाळे यशवंतरावांजवळ आले आणि म्हणाले, ‘कुठे चाललात?’ यशवंतराव म्हणाले, ‘अर्थातच मुंबईला. नवं काम अंगावर घ्यायला.’ त्यांनी आनंद व्यक्त केला आणि म्हणाले, ‘यशवंतरावजी, आपण फार चांगल्या दिवशी हे काम अंगावर घेत आहात.’ यशवंतराव उत्तरले, ‘रावसाहेब मी काही पंचांग बघून निघालेलो नाही. पण आज असा कोणता महत्त्वाचा दिवस आहे?’ ते म्हणाले, ‘अहो यशवंतरावजी, आज 14 एप्रिल आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज जन्मदिवस आहे.’ यशवंतरावांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, ‘रावसाहेब, माझ्या ध्यानीमनी नसताना हा दिवस निवडला गेला ही माझ्या जीवनातली महत्त्वाची घटना आहे असे मी मानतो.
यशवंतराव शेवटी लिहितात, ‘डेक्कन क्वीन खंडाळय़ाच्या घाटातून एकेक बोगदे पार करीत होती. कधी अंधार, कधी प्रकाश असा खेळ खेळत आमचा प्रवास चालला होता. पुढच्या जीवनाचे तर हे प्रतीक नव्हते? वाचकांनो, प्रत्येकाचे आयुष्य म्हणजे ऊनसावलीचा खेळ, सुखदुःख यांची पाठशिवणी. पण जे आपले वैयक्तिक जीवन देशावरून ओवाळून टाकतात त्यांची बातच न्यारी ना? यशवंतरावांच्या चरित्रातून काय काय शिकावे? दीर्घोद्योग, चिकाटी, स्वाभिमान, लवचिकता, प्रखर देशभक्ती, मातृभक्ती, पत्नीविषयी प्रेम आणि अपराजित व्यक्तिमत्त्व.
कृष्णाकाठ
यशवंतराव चव्हाण आत्मचरित्र
प्रकाशक – रोहन प्रकाशन (जन आवृत्ती)
किंमत – रु. 160/-.


























































