कऱ्हाडमधली खपली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

मी कोल्हापूरला जातो किंवा तिथून परततो तेव्हा तेव्हा मला कऱ्हाडमध्ये डोकावंसं वाटतं.

कऱ्हाड हे वाकडी वाट करून पाहावं असं छोटं शहर आहे, असं कऱ्हाडकरही कदाचित म्हणणार नाहीत. एखाद्या कऱहाडे ब्राह्मणाचा अभिमान उसळून येईलही! कारण कऱ्हाडे ब्राह्मण मूळ कऱहाडचे; पण पुढे ते पोटापाण्यासाठी कोकणात मालवण-संगमेश्वरला गेले आणि तिथेच स्थायिक झाले. आज कदाचित कऱहाडमध्ये कऱ्हाडे ब्राह्मण फारसे सापडणारही नाहीत. तांबे, नेवाळकर, किर्लोस्कर, गोळवलकर, जांभेकर वगैरे आडनावं सापडतात कऱहाडात? किर्लोस्करवाडी मात्र जवळ आहे, पण तशी ती सांगली जिल्हय़ातली. मी स्वतः कऱ्हाडे नाही, पण तरीही मला कऱहाडबद्दल प्रेम आहे. कारण आयुष्यातले आठ-दहा महिने मी तिथे घालवले आहेत. तिथल्या सर्व आठवणी गोड होत्या असंही नाही, पण काही बंध एकदा बांधले की तुटत नाहीत.

मध्यंतरी कोल्हापूरहून येताना वाटेत, कऱहाडला एक चक्कर मारून आलो. कृष्णा-कोयनाच्या संगमावर गेलो. यशवंतराव चव्हाणांचं सुंदर स्मारक तिथे उभारलंय. लांबून तो जुना हायवेवरचा पूल पाहिला. एसटीतून येताना कऱहाडमध्ये शिरण्यापूर्वी लागायचा. आम्ही त्याला ‘झुलता पूल’ म्हणायचो. तो हलायचा. पण ते पूल कोसळण्याचे दिवस नव्हते. आता तो संन्यासाश्रमात गेलेला दिसला.

बाय द वे, मूळ मुद्दा मी विसरलो. कऱहाडमध्ये का राहत होतो ते सांगायचं! मी कऱ्हाडच्या इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये होतो. तिथून पुढे नंतर मी व्हीजेटीआयला गेलो. कऱ्हाडला स्वेच्छेने वगैरे गेलो नव्हतो. व्हीजेटीआयमध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून गेलो होतो. मला माझा कऱहाडमधला पहिला दिवस आठवतो. दोन दिवस राहणेही अशक्य आहे असं वाटतं होतं. केवळ इंजिनीयरिंग व्हायची मूर्ख पण दुर्दम्य माझ्या वडिलांची इच्छा म्हणून राहिलो. ते दोन कठीण दिवस सरले आणि मी कऱ्हाडकर होऊन गेलो. सोमवार पेठेत मी सप्रे वाडय़ात राहत होतो. त्यांनी वाडय़ाला काही खोल्या विद्यार्थ्यांसाठी बांधल्या होत्या. आम्ही पाच-सहाजण होतो. आम्ही तिघं एका खोलीत. मी, दिलीप घोरपडे आणि रामेश्वर विजर्गी. 1969 साली सुरू झालेली ही मैत्री आजही घट्ट आहे. शाळा-कॉलेजची निर्व्याज मैत्री सहसा तुटत नाही. ‘अरे विजर्गी, तुझ्या चहाला जगात कशाची म्हणजे कशाची चव नाही.’ हा कौतुकाचा पुष्पगुच्छ मी आणि दिलीपने विजर्गीला पहिल्या दिवशी दिला. त्यानंतर आमचा पहिला चहा नेहमी तोच करायचा. दुसरा चहा आणि ब्रेकफास्ट जवळच्या प्रभातमध्ये व्हायचा. आजही मला ते पदार्थ आठवतात, त्याच्या किमतीसकट! शिरा, उप्पीट, उपमा पंधरा पैसे आणि मसाला डोसा पंचवीस पैसे आणि चहा दहा पैसे! त्यावेळी मनिऑर्डर आली की सुरुवातीला चार-पाच दिवस मसाला डोसाची ऑर्डर दिली जाई आणि मग हळूहळू फक्त शिरा किंवा तिघात दोन शिरा किंवा शिरा-उप्पीट, दोन चहा, कधी फक्त चहा, कधी मनिऑर्डर आल्यावर पैसे देऊ वगैरे आश्वासनावर महिन्याची अखेर पार पडायची. घरून दीडशे रुपयाची मनिऑर्डर येई. त्यावेळी पैशाची किंमत फार कमी असते आपल्याला. आता जाणवतं की, वडील केवळ मी इंजिनीयर व्हावं म्हणून कसाबसा काळजाचा एक तुकडा काढून देत होते. त्या दिवशी संगमावरून मी गाडी सोमवार पेठेत नेली, पण सोमवारातल्या गल्ल्या अजून अरुंदच आहेत. त्यामुळे हमरस्त्यावरच आलो. पुन्हा एकदा कुलकर्ण्यांच्या खानावळीपाशी पाय थबकले. दर सोमवारी उपवास नसताना फक्त साबुदाणा खिचडी आणि दही खायला मी जायचो. तो पहिला मजला मला दिसला, पण ती खाणावळ, ते कुलकर्णी तिथे नव्हते. सप्रे वाडाही नव्हता आणि ते प्रभात हॉटेलही. काळाने काळी जादू करून माझं भावविश्व उद्ध्वस्त केल्यासारखं वाटलं, पण मन काळाला जुमानत नाही. ते भूतकाळात खोलवर शिरतं. कऱहाडच्या एसटी स्टॅण्डवरून येणारा मागचा लांबलचक रस्ता तसाच आहे. कॉलेजमधून आल्यावर संध्याकाळी तिथेच आम्ही फेरफटका मारायला जायचो. जी काही थोडीफार सौंदर्यस्थळं त्या काळात कऱहाडात होती ती तिथे दिसत. तिथून एसटी स्टॅण्डवर जायचं आणि लक्ष मुंबईच्या एसटीवर! कारण मुंबई-पुण्याहून येणाऱया आणि पुढे जाणाऱया एसटीत अधूनमधून चंद्रकोरी दिसायच्या. कऱहाडात असताना पौर्णिमेलासुद्धा आम्ही आकाशातल्या चंद्राकडे पाहिलं नाही. त्या काळात अपेक्षाचं आमचं दारिद्रय़ किती मोठं होतं हे कळेल. पण सामाजिक स्थिती तशी होती. माझी आई, आत्या वगैरे कधी माझ्याकडे आली आणि आम्ही हॉटेलमध्ये खायला गेलो तर लोकं टकमक पाहायची. बायकांनी हॉटेलात जाणं हे फारस शिष्टसंमत नव्हतं. मी त्या वर्षभरात कऱहाडमध्ये तीन-चार बॉबकट केलेल्या मुली पाहिल्या असतील. त्यापेक्षा जास्त नाही. त्या काळात तिथल्या, संत गाडगे महाराज कॉलेजात अनवाणी मुलं-मुली मी पाहिल्या आहेत. शहरातली श्रीमंत छोटय़ा शहरात, तळागाळात झिरपली नव्हती. कऱहाडात मी सायकलने फिरायचो. किंबहुना सायकल फिरवण्याची हौस मी कऱहाडात भागवली. महिन्याला पंधरा रुपये भाडं द्यायचो आणि सायकलने कॉलेजला जायचो. कॉलेज येण्यापूर्वी तिथे कृष्णा नदीवर एक पूल होता. आधी उतार आणि मग चढणं. मोमेंटम (Momentum) चा अर्थ मला त्या पुलाने शिकवला. वेगात जर सायकल वरतून सोडली तर पुढचा अर्धा चढ कापला जायचा, पण त्याच्या पुढचा अर्धा चढ चढताना नाकी काय, पायी नऊ यायचे. परवा त्या रस्त्यावरून मी गाडीने गेलो. तो उतार आणि चढाचे आता दात पडले आहेत. जवळपास कॉलेजपर्यंत वस्ती झालीए. मुला-मुलींच्या कपडय़ातून आजची स्टाइल आणि सुखवस्तूपणा टपकत होता. कॉलेज तसंच आहे. गाडीत बसून मी मनाला कॉलेजमध्ये भरधाव सोडलं. मन, ते हॉटेल, ते क्रिकेटचे मैदान, ते कॅण्टीन, ते वर्ग फिरून आलं! तिथले काही मित्र आज हयात नाहीत, काही कुठे आहेत देव जाणे! गावातल्या विद्यार्थ्यांकडेही प्रचंड बुद्धिमत्ता असते हे मला त्या वर्षभराच्या वास्तव्याने शिकवलं. साध्या साध्या वाटणाऱया वर्गातल्या मुली किती हुशार होत्या. हुशारीची मक्तेदारी शहराकडे अजिबात नाही. मी तिथे राजकीय मक्तेदारी शिकलो.

माझ्या बायकोला आणि मित्र अमित याच्या बायकोला कऱहाडात कधीही रस नव्हता. का असावा? कऱहाड हे त्यांच्यासाठी महाराष्ट्रातल्या कुठल्याही तालुका शहरासारखं होतं. माझ्या आठवणी तिथे गुंतल्या होत्या.

तिथून निघताना मनावरच्या एका क्रणाची खपली निघाली. व्हीजेटीआयमध्ये येण्यापूर्वी मी कऱहाडला गेलो होतो. मित्राकडे सप्रेवाडय़ात राहायचो. त्याच्याबरोबर एका खाणावळीत जायचो. त्या खाणावळवालीची एक सुंदर भाची होती. तिच्या मुक्या भावना मला कळायच्या. तिला मुंबईत सोडण्याची जबाबदारी माझ्यावर आली. मुंबईपर्यंतचा प्रवास आम्ही गप्पात घालवला. उतरल्यावर मला तिच्या डोळय़ात अश्रू दिसले. मी म्हटलं काय झालं? ती म्हणाली ‘मी इथे माझ्या लग्नासाठी आलेय. माझं लग्न ठरलंय.’ तिने माझ्याकडे अपेक्षेने पाहिले. मी थंड स्तब्ध होतो. तिने बॅग उचलली ती निघून गेली. पाठी एकदाही वळून न पाहता, पण जाताना एक जखम मनावर ठेवून गेली. परवा कऱहाडला त्या जखमेवरची खपली किंचित निघाली.

z [email protected]