सांस्कृतिक अवशेषांचे कलादालन संग्रहालय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. मंजिरी भालेराव

आपल्याला मिळालेला वारसा नेमका काय आहे हे जोपर्यंत लोकांना समजत नाही तोपर्यंत त्यांना त्याचे महत्त्व समजत नाही. जोपर्यंत त्याचे महत्त्व समजत नाही, तोपर्यंत त्याचे जतन आणि संवर्धन केले पाहिजे याची जाणीवच निर्माण होत नाही, पण अशा प्रकारचा वारसा फक्त स्थापत्यात पाहायला मिळत नाही, तर तो खूप मोठय़ा प्रमाणावर संग्रहालयात जपून ठेवलेला असतो. अशा प्रकारच्या संग्रहालयांच्या निर्मितीची प्रक्रिया संपूर्ण जगात सुरू आहे.

संग्रहालय म्हणजे सांस्कृतिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाच्या वस्तूंचा संग्रह करून तो नीट जतन करून लोकांना पाहायला उपलब्ध करून देणारी संस्था. या महत्त्वाच्या वस्तूंमध्ये कधी कलात्मक वस्तू, कधी ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाच्या वस्तू तर काही नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या वस्तूंचा समावेश होतो. अशा प्रकारच्या संग्रहाचा उपयोग समाजाला आपल्या इतिहासाचे शिक्षण देण्यासाठी तर होतोच, पण आपल्या पूर्वजांचे संचित जपण्यासाठीही होतो. संग्रहालये शैक्षणिक क्षेत्रात खूप महत्त्वाची कामगिरी बजावू शकतात. त्यांच्याकडे असलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवून त्यांची माहिती समाजाला देऊ शकतात.

संग्रहालयांमध्ये ज्या प्राचीन वस्तू जतन करून ठेवल्या असतात, त्यामध्ये प्रागैतिहासिक काळात मानवाने बनवलेली दगडी हत्यारे तसेच इतिहासपूर्व काळातील मानवाने बनवलेल्या आणि उत्खननात सापडलेल्या काही वस्तू यांची व्यवस्थित मांडणी करून त्यांचा नेमका अर्थ काय याबद्दलच्या सविस्तर टिपा लिहून ठेवलेल्या असतात. त्यांच्या मदतीने प्रेक्षक त्या वस्तूंचा अर्थ समजून घेतो, पण ऐतिहासिक काळातील वस्तूंमध्ये खूप मोठय़ा प्रमाणावर विविधता असते. आज न समजणारी लिपी आणि भाषा वापरून लेख लिहिलेले असतात, नाणी असतात, मूर्ती असतात, चित्रं असतात तसेच प्राचीन मानवाने वापरलेल्या आणि त्याच्या भौतिक जीवनाचा भाग असलेल्या बऱयाच वस्तू तिथे आढळतात, पण मूळ संदर्भातून जरी त्या गोष्टी बाजूला करून ठेवल्या असल्या तरी त्यांचा अर्थ समजावून सांगण्याची जबाबदारी संग्रहालयाच्या पदाधिकाऱयांची असते.

ऐतिहासिक काळातील विविध कथनशिल्पे असलेले स्थापत्याचे अवशेष संग्रहालयात नीट ठेवलेले असतात. हिंदुस्थानी कला ही प्रतीकात्मक कला असल्यामुळे जर ती प्रतीके समजली नाहीत तर त्या शिल्पांचे अर्थही समजत नाहीत. उदा. 1814 साली स्थापन झालेल्या कोलकात्याच्या इंडियन म्युझियममध्ये मध्य प्रदेश येथील सतनाजवळ असलेल्या भारहूत या ठिकाणी असलेल्या इ.स. पूर्व दुसऱया शतकातील स्तूपाच्या वेदिका आणि त्यावरील शिल्पांची पुनर्रचना अतिशय उत्तम प्रकारे करून ठेवली आहे, पण त्या शिल्पांमध्ये काय सांगितले आहे हे जर कळले नाही तर ती पाहून आपल्याला समाधान मिळत नाही. अशाच अनेक देवदेवतांच्या, यक्ष-यक्षींच्या मूर्ती विविध संग्रहालयांतून जतन करून ठेवलेल्या असतात. त्यांचा योग्य तो अभ्यास करून त्यांची खरी ओळख किंवा माहिती तिथे लिहून ठेवण्याची जबाबदारी ही संग्रहालयांची असते. ही जबाबदारी खरे तर फार मोठी आहे. कारण हिंदुस्थानी देवदेवतांचे खरे स्वरूप नीट कळले नाही तर हिंदुस्थानी धर्म आणि इतिहास माहीत नसलेल्या लोकांचा त्याबद्दल गैरसमज होऊ शकतो. मानव आणि प्राणी यांच्या शरीराचे भाग एकत्र करून केलेल्या देवतांच्या मिश्र मूर्तींची नेमकी संकल्पना काय आहे हे जर समजले नाही तर त्या मूर्तींच्या स्वरूपाचा विपर्यास होऊ शकतो. त्यामुळे संग्रहालयांवर ही फार मोठी जबाबदारी असते.

याशिवाय विविध कालखंडांतील शस्त्रास्त्रsसुद्धा या संग्रहालयात ठेवलेली असतात. त्या शस्त्रांचा प्राचीन काळी कसा उपयोग केला जात होता याचेही संशोधन करून त्याची योग्य माहिती संग्रहालयात लावण्याची जबाबदारी संग्रहालयावर असते. याचा सामान्य लोकांनाच नव्हे तर अभ्यासकांना आणि संशोधकांनाही उपयोग होतो.

वारसा हा फक्त सांस्कृतिक नसतो तर नैसर्गिकसुद्धा असतो. त्याचेही जतन केलेले अशा प्रकारच्या संग्रहालयात दिसून येते. उदा. अश्मीभूत (fossil) झालेल्या अनेक नैसर्गिक गोष्टी या संग्रहालयांमध्ये जपून ठेवलेल्या दिसतात. जसे अश्मीभूत झालेले एक संपूर्ण झाड, डायनोसोरची अंडी, प्राचीन प्राण्यांची हाडे, कवटय़ा, काही दगडांवर आढळणारे पानांचे ठसे, ज्वालामुखीची राख इ. काही संग्रहालये ही विशिष्ट विषयाच्या संग्रहासाठी असतात. उदा. चित्रकला, पुरातत्त्व, शेतीच्या विकासाचा अभ्यास, पैसे आणि चलनाचा इतिहास, नौदलाचा इतिहास आणि अशी अनेक प्रकारची संग्रहालये असतात. काही संग्रहालये लहान मुलांमध्ये जागृती निर्माण व्हावी तसेच त्यांच्यामध्ये शिल्पकलेविषयी उत्सुकता निर्माण व्हावी म्हणून अनेक उपक्रम करतात. शाळेतील मुलांच्या अभ्यास सहली नेल्या जातात, त्यांना पुरावस्तूंची माहिती दिली जाते. अनेक संग्रहालयांमध्ये टच स्क्रीन खेळ असतात. या सर्व उपक्रमांमुळे मुलांमध्ये या विषयाची आवड निर्माण होते, इतिहासाबद्दल प्रेम आणि देशाबद्दल अभिमान निर्माण होतो. या सर्व उपक्रमांच्या आयोजनामध्ये संग्रहालयांची जबाबदारी मोठी असते. आपल्या देशातील अनेक संग्रहालये हे उपक्रम आयोजित करून जनजागृतीं करत आहेत.

(लेखिका संस्कृत आणि भारतीय विद्या विभाग, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे ‘येथे सहयोगी प्राध्यापिका आहेत)
– [email protected]