मालवणातील देवली येथे अनधिकृत वाळू रॅम्प तोडले; महसूल व खनिकर्म विभागाची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

देवली येथे अनधिकृत वाळू रॅम्पच्या ठिकाणी आढळून आलेले तीन डंपर खनिकर्म विभागाने पकडून महसूलच्या ताब्यात दिले. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी व बुधवारी सकाळी करण्यात आली. यात 10 अनधिकृत रॅम्प जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आले. संबंधित डंपरच्या मालकांना महसूल प्रशासनाच्यावतीने कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

देवली पट्ट्यात अनधिकृतरीत्या वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी महसूल व खनिकर्म कार्यालयाकडे केल्या होत्या. त्यानुसार जिल्हा खनिकर्म विभागाचे दिवेकर, मंडळ अधिकारी मंगेश तपकीरकर, तलाठी डी. सी. ठाकूर यांच्या पथकाने देवली येथे अचानक छापा टाकला. यावेळी सचिन अशोक रेवंडकर, महेश दत्तात्रय शिरसाट , मेहबूब अली वालीकर यांच्या मालकीचे डंपर अनधिकृत रॅम्पच्या ठिकाणी आढळून आले. यातील मेहबूब वालीकर यांच्याकडे वाळू भरलेल्याचा पास आढळून आला. तर अन्य दोन डंपरमध्ये अनधिकृत रॅम्पवरून वाळू भरली जात होती. त्यामुळे महसूल विभागाने हे तिन्ही डंपर ताब्यात घेत येथील तहसील कार्यालयात आणण्यात आले आहेत. याठिकाणी दहा अनधिकृत रॅम्प आढळून आल्याने हे सर्व रॅम्प जेसीबीच्या साहाय्याने हटविण्याची कार्यवाही करण्यात आली.