
सामना ऑनलाईन, मुंबई
दहावीच्या घसरलेल्या निकालामुळे गुणांची सूज कमी झाली असली तरी अवघ्या काही गुणांसाठी नापास झालेल्या राज्यातील तब्बल 3 लाख 91 हजार 959 विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात गेले आहे. यंदाच्या निकालामुळे अकरावीच्या प्रवेशाचे वाट्टोळे होणार आहेच, पण नापास झालेल्या लाखो विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षणाचे दारही बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. या निकालामुळे नाराज झालेल्या शिक्षक, मुख्याध्यापकांकडून दहावीचा बदललेला पेपर पॅटर्न, तोंडी परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्याची मागणी होत आहे.
नापास विद्यार्थ्यांची संख्या यंदा 2 लाख 19 हजार 549ने वाढली आहे. गेल्यावर्षी 1 लाख 72 हजार 410 विद्यार्थी नापास झाले होते. नापास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुसंख्य विद्यार्थ्यांची अवघ्या 10-12 गुणांसाठी दांडी उडाली आहे. अंधेरी येथील हंसराज मोरारजी शाळेचे शिक्षक उदय नरे यांनी शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र पाठवून दहावीच्या निकालावर चिंतन करण्याचे मत व्यक्त केले आहे. भाषा विषयांसाठी यंदा प्रथमच देण्यात आलेल्या कृतिपत्रिका विद्यार्थ्यांना जड गेल्या. यापूर्वी 80 गुणांची प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी तीन तासांचा वेळ होता. 100 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवायलाही तीन तास असल्याने विद्यार्थ्यांचा पेपर अपूर्णच राहिल्याचे नरे यांनी निदर्शनास आणून दिले.
विधानसभेत आवाज उठविणार-युवासेना
यंदाच्या निकालामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान युवासेना कदापि सहन करणार नाही. तोंडी परीक्षा न घेण्याचा निर्णय मागे घेण्याची आमची मागणी आजही आहे. सरकारने ती पूर्ण करायलाच हवी, असे युवा सेना कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे यांनी सांगितले. दहावीच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात शिवसेना व युवासेनेच्या वतीने अधिवेशनात आवाज उठविला जाईल.
आता विद्यार्थी गळती वाढण्याची भीती
तोंडी परीक्षांचे 20 गुण हवे होते. याचा परिणाम निश्चितच निकालावर झाला आहे. महापालिका शाळांमधील मुलांना या गुणांची खरी गरज आहे. ही मुले काम करून शिक्षण घेतात. त्यांना शाळेत आणण्यासाठी शिक्षकांनीही खूप मेहनत घेतली होती. पण हे विद्यार्थी 5 ते 6 गुणांसाठी नापास झाले आहेत. आता पुन्हा परीक्षा फी भरून हे विद्यार्थी परीक्षेला बसतील का? राज्यात पुन्हा एकदा विद्यार्थी गळती वाढण्याची भीती आहे- अंबरसिंग मगर, मुख्याध्यापक, कुलाबा महापालिका माध्यमिक शाळा
विद्यार्थ्यांना 100 गुणांच्या पेपरची सवय नाही
दहावीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयांसाठी 100 गुणांचा पेपर देण्याचे फर्मान अचानक काढण्यात आले. याचा आम्ही सुरुवातीपासूनच विरोध केल्याचे बृहन्मुंबई मुख्याध्यापक संघाचे प्रशांत रेडीज यांनी सांगितले. पहिली ते नववीपर्यंत विद्यार्थ्यांना 100 गुणांचा पेपर सोडविण्याची सवय नाही. आतापर्यंत विद्यार्थी 80 गुणांची लेखी परीक्षा आणि 20 गुणांची भाषिक कौशल्य परीक्षा देऊनच पुढे आला आहे. त्यामुळे 100 गुणांचा पेपर देणे शक्यच नाही.





























































