
भागीदारी करून चालवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या भागीदारी तत्त्वावर रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळणार असल्या तरी पालिकेच्या दरांनुसारच आरोग्य सेवा शुल्क घेतले जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शिवाय रुग्णालयातील 50 टक्के खाटा पालिकेच्या रुग्णांसाठी आणि सरकारी आरोग्य योजनांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.
पालिकेने बोरिवली पश्चिम येथील श्री हरीलाल भगवती हॉस्पिटलची पुनर्रचना करून तिथे 490 खाटांचे सर्व सोयींनी युक्त असलेले ‘मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल’ उभे केले आहे. यामध्ये 90 आयसीयू खाटा आणि वैद्यकीय उपचारांसाठी लागणारी सर्व अत्याधुनिक यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. हे अवाढव्य रुग्णालय अत्यंत उच्च दर्जाच्या वैद्यकीय मानकांनुसार चालावे, पण त्याच वेळी पालिकेच्या तिजोरीवर आणि पर्यायाने करदात्या नागरिकांवर त्याचा अतिरिक्त आर्थिक भार पडू नये, यासाठी हे रुग्णालय 30 वर्षांच्या करारावर ‘सार्वजनिक-खासगी भागीदारी’ (पीपीई) मॉडेलअंतर्गत चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिकेच्या वतीने निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भागीदारी म्हणजे खासगीकरण नसल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
उपचारांचे दर पालिका निर्धारित करणार
- खासगी तत्त्वावर रुग्णालय चालवण्यास देण्यात येत असले तरी आरोग्य सेवांचे शुल्क पालिकेने निर्धारित केलेल्या दरांनुसारच आकारणे कंत्राटदाराला बंधनकारक राहणार.
- यामध्ये सर्वसामान्य रुग्णांसाठी ओपीडी तपासणी फी फक्त 10 रुपये, स्पेशालिटी ओपीडी 293, तर मोठय़ा शस्त्रक्रियेसाठीचे ऑपरेशन थिएटर दर कमाल 1200 राहणार.
- करारानुसार खासगी ऑपरेटरला स्वतःचे किमान 150 कोटी गुंतवावे लागतील. ज्यामुळे पालिकेच्या पैशांची बचत होणार असून अद्ययावत कॅथ लॅब, एमआरआय, सीटी स्कॅन आणि 9 आधुनिक ऑपरेशन थिएटर्स उपलब्ध होतील
असा होणार 30 वर्षांचा करार
- रुग्णालयाचा 100 टक्के मालकी हक्क पालिकेचाच राहणार.
- रुग्णालयात मराठीत फलक लावणे बंधनकारक.
- पालिकेच्या आणि खासगी रुग्णांना एकाच दर्जाचे उपचार.
- उपलब्ध बेडची संख्या लाइव्ह कळण्याची सुविधा.
- किमान 6.56 कोटी वार्षिक भाडे आगाऊ मिळणार.
- रुग्णालयात पालिकेकडून विशेष कार्यकारी अधिकारी.
- सेवेत दिरंगाई केल्यास भाडय़ावर 25 टक्के दंड.





















































