सरकारी शाळांमध्ये अजब ‘योगा’, बुद्धी तल्लख होण्यासाठी विद्यार्थी काढणार ‘उठाबशा’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, चंदिगड

नुकताच योग दिन संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. योगासनांचे फायदेही सर्वांशी शेअर करण्यात आले. पण, हरयाणातल्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने अजब योगा सुचवला आहे. योगासनांऐवजी रोज शाळेत उठाबशा काढल्याने मुलांची बुद्धी तल्लख होईल, असं सांगत हा प्रयोग करण्यात येणार आहे. ज्या उठाबशा आपल्याला लहानपणी खोड्या काढल्यानंतर शिक्षा म्हणून काढाव्या लागत होत्या, त्या उठाबशा विद्यार्थी व्यायाम म्हणून काढणार आहेत.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, हरयाणाच्या शालेय शिक्षण विभागाने प्रायोगिक तत्वावर हा उठाबशांचा प्रयोग राबवण्याचं निश्चित केलं आहे. या प्रयोगाची सुरुवात येथील एका सरकारी शाळेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने असा दावा केला आहे की, उठाबशा हा मेंदूसाठीचा एक उत्तम असा योगासनाचा प्रकार आहे. कान पकडून हा व्यायाम केल्याने बुद्घी तल्लख होते. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनाही रोज शाळेच्या सुरुवातीला 14 उठाबशा काढाव्या लागणार आहेत.

शिक्षण विभागाच्या राजीव प्रसाद यांनी उठाबशा हा ब्रेन योगा असल्याचं सांगितलं आहे. देशातल्या प्राचीन परंपरांना पुन्हा एकदा जागृत करण्यासाठीच हा नियम बनवल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.