
सामना प्रतिनिधी । परभणी
परभणी ते जिंतूर हा राज्यरस्ता दुरुस्तीच्या नावाखाली अनेक दिवसांपासून उखडला आहे. या रस्त्यावरुन ये-जा करणे अत्यंत धोकादायक बनले आहे. थोडासा पाऊस आला तरी या रस्त्यावरुन वाहन चालविणे मोठे जिकरीचे बनले आहे. पावसाळा तोंडावर आलेला असतानाही रस्ता दुरुस्तीच्या कामाकडे कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हा रस्ता चिखलवाट बनला आहे. या मार्गावरुन एस.टी.बसेस अक्षरश: चिखलात स्लीप होत असल्याने या वाहनापासून इतर वाहने दुर ठेवावी लागत आहेत. परिणामी वेळेचा अपव्यय होत असून अपघाताची शक्यताही दाट झाली आहे.
परभणीला जोडणारे परभणी-जिंतूर, परभणी-मानवत आणि परभणी वसमत या मार्गावरील राज्यरस्ता अक्षरश: उखडला आहे. या मार्गावरुन वाहने चालविणे कसरतीचे काम होऊन बसले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात निवीदा भरताना कागदपत्राची तपासणी महालेखापालाचे स्वतंत्र प्रतिनिधी म्हणून कार्यकारी अभियंता काम पाहतात. या कामासाठी कुठलीही नियमावली नव्हती. परंतु शासनाने नुकतीच संबंधीत कंत्राटदारास जबाबदार धरले आहे. असे असतानाही परभणीत अनेक दिवसांपासून रस्ता उखडलेला असताना तो दुरुस्त करण्याककडे दुर्लक्ष केले जाते. तसेच कंत्राटदारावरही जबाबदारी दिली असताना ती पूर्ण होत नाही. परिणमी रस्त्याचे काम दिवसेंदिवस उखडलेल्या अवस्थेतच आहे. रस्ता अरुंद झाल्यामुळे समोरासमोरील दोन वाहनांना मार्गक्रमणकरणे अवघड झाले असतानाच त्यात भरीस भर पावसाची पडत आहे. या रस्त्यांवर धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या धुळीचे रुपांतर पाणी पडल्यामुळे चिखलात झाले आहे. या चिखलातून मार्ग काढत असताना दुचाकी, तीन चाकी व चारचाकी आदी वाहने स्लीप होत आहेत. त्याचबरोबर एस.टी. बसेस आणि खाजगी ट्रॅव्हल्स यांची सुद्धा अवस्था अशीच बनली आहे.































































