अंधेरीच्या केंब्रिज शाळेत फायर सेफ्टीचे काम सुरू;शिवसेनेच्या दणक्यानंतर प्रशासन कामाला लागले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

फायर सेफ्टी नसल्याचे कारण देत 4 जुलैपासून पालिकेने बंद केलेली अंधेरीची केंब्रिज शाळा लवकरच सुरू होणार आहे. शाळा बंद केल्यामुळे अडीच हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले होते. शिवसेनेने याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन सुरू केले होते. अखेर शाळेने फायर सेफ्टीचे काम सुरू केल्यामुळे  शिवसेनेने आज गेल्या सहा दिवसांपासून सुरू केलेले धरणे आंदोलन मागे घेतले.

 शाळेला फायर सेफ्टीच्या अटी पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळही देण्यात आला नाही.  या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार पालिका प्रशासनाच्या या अन्यायकारक कारवाईविरोधात आंदोलन सुरू होते. शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिवसेना आमदार ऍड. अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यानंतर पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याशी झालेल्या बैठकीत शाळेला फायर सेफ्टीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश देतानाच पालिका प्रशासनाला शाळा सुरू करण्याची कार्यवाही करण्याचे आदेशही दिले होते. यानुसार अग्निशमन दलाकडून आज शाळेला भेट देऊन कार्यवाही करण्यात आली.  दरम्यान, शिवसेनेमुळे शाळेतील अडीच हजार विद्यार्थी आणि 200 हून जास्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचे भवितव्य वाचणार असल्यामुळे पालकांकडून शिवसेनेचे आभार मानले जात आहेत.