सत्ताधाऱयांकडून इतर पक्षांतील नेत्यांना धमकावले जातेय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sharad pawar

सामना प्रतिनिधी। पुणे

सत्ताधाऱयांकडून इतर पक्षांतील नेत्यांना सत्तांतर आणि पक्षबदलासाठी ईडी आणि सीबीआयसारख्या यंत्रणांकडून धमकावले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः आमदारांना फोन करीत असून अशा प्रकारचे सूड, दबावाचे राजकारण लोकशाहीला घातक असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते आणि आमदार पक्षाला रामराम ठोकून जात असल्याच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी ऱविवारी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस आणि सरकारवर थेट आरोप केले. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपमध्ये जाण्यास नकार दिल्यानेच त्यांच्या घरावर छापे टाकण्यात आले. सत्ताधाऱयांनी काही नेत्यांना केवळ धमकावण्याच्या कामाची जबाबदारी दिलेली दिसते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः आमदारांना फोन करतात. त्यांच्या मंत्रिमंडळातील काही सहकारी विरोधी पक्षांतील नेत्यांशी संपर्क करून त्यांना पक्षात येण्यासाठी आग्रह धरला जात आहे असा आरोप करून पवार यांनी पक्षांतरबंदीबाबत संसद आणि विधिमंडळात तयार केलेले कायदे अशा पद्धतीने धुळीस मिळवले जात असल्याची टीका केली.

आघाडीत 240 जागांवर एकमत
आगामी विधानसभा निवडणूक लोकसभेप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडी करून लढणार आहे. आतापर्यंत झालेल्या चर्चेत दोन्ही पक्षांकडून प्रत्येकी 120 अशा 240 जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित जागा या आघाडीचे घटकपक्ष असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, रिपाइं कवाडे गट यासारख्या समविचारी पक्षांना दिल्या जातील, असे पवार यांनी सांगितले.