बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तीन पक्षांच्या आघाडीचे सरकार हे एक कुटुंब आहे. आपले सरकार आहे. केवळ आपले नाही, तर सर्वसामान्य जनतेला वाटले पाहिजे की, हे माझे सरकार आहे. हे सरकार तसेच असेल. ते सूडबुद्धीने वागणार नाही, पण वाटेत आडवे येऊ नका. आलात तर तुम्हाला तिन्ही पक्षांचे वाघ सरळ करतील, असा सणसणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे आज सोपविण्यात आले. त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानताना उद्धव ठाकरे म्हणाले, संघर्षात विजय मिळाला की मला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण नक्की येते.

मला काहीतरी व्हायचे आहे हा विचार मी स्वप्नातही केला नव्हता. माझ्या आजोबांपासून जी परंपरा आहे तीच सांभाळण्याचा मी प्रयत्न करतो आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. या वेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे विशेष आभार मानले. तसेच शिवसेना वाढवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आयुष्य वेचले त्यांच्या स्मृतींनाही उजाळा दिला.

मैदान मारणारे आणि गाजवणारे

शरद पवार म्हणाले आपण आखाडय़ात पहिल्यांदा आलो आहोत त्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले, आखाडय़ात पहिल्यांदा येत असलो तरी आपण सगळेजण मैदानातील आहोत. मैदान मारणारे आणि गाजवणारे यांना आखाडय़ात उतरल्यानंतर वेगळे काही करावे लागत असेल असे मला वाटत नाही. या सरकारमध्ये एवढे ज्येष्ठ आणि अनुभवी सदस्य आहेत की, महाराष्ट्रात असे सरकार कधीच झाले नसेल असे वाटते, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

खोटय़ाला कधीही साथ देणार नाही

माझा कुणाविरोधातही व्यक्तिगत संघर्ष नाही. टोकाची भूमिका मला का घ्यावी लागली याचा विचार करा. खोटं बोलणं माझ्या हिंदुत्वात नाही. खोटय़ाला साथ देणं हे माझ्या स्वभावात बसत नाही आणि खोटय़ाला कधीही साथ देणार नाही, असेही ठणकावतानाच मुख्यमंत्रीपदाबाबत आमचं काही ठरलंच नव्हतं हे आज पुन्हा ऐकल्याने अधिकच इंगळय़ा डसल्या, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. गरज वाटली की शिवसेनेकडे यायचे, मिठय़ा मारायच्या आणि गरज संपल्यावर शिवसेनेला सोडून द्यायचे. तुमच्या पालख्या वाहण्यासाठी शिवसेनेची स्थापना करण्यात आलेली नाही, असा घणाघाती हल्लाही त्यांनी भाजपवर केला.

मोठय़ा भावाला भेटण्यास दिल्लीला जाणार

सरकार स्थापन झाले की मी मोठय़ा भावालासुद्धा भेटायला दिल्लीत जाईन. कारण त्यांनीच जाहीर सभेत लहान भाऊ असे म्हटले होते, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मारताच सभागृहात एकच हंशा उसळला.

तुमच्या सोबतीची गरज

हे सरकार म्हणजे शिवधनुष्य आहे. ते पेलण्यासाठी तुमच्या सोबतीची, साथीची गरज आहे असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी आमदारांना केले. मुख्यमंत्री मी एकटा नाही, तर तुम्ही सर्वजण आहात. (टाळय़ा) अत्यंत नम्रपणे ही जबाबदारी मी स्वीकारतोय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

अश्रू पुसण्यासाठी शपथबद्ध राहूया

छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र. एक चांगला, सुसंस्कृत महाराष्ट्र. या माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱयांच्या डोळय़ातील अश्रू पुसण्यासाठी, त्यांना आनंद देण्यासाठी आपण आजपासून शपथबद्ध राहूया, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी या वेळी केले.

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीतील खिळे ठोकणार

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत अनेक काटे असतात, अनेक खिळे असतात. जाणारा मुख्यमंत्रीसुद्धा जाताना दोन-चार खिळे लावून जातो (हंशा). मात्र हे खुर्चीतील खिळे ठोकण्यासाठी माझ्याकडे आघाडीच्या आमदारांचा मजबूत हातोडा आहे. मला काळजी नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

तीन दिशेला असणारे पक्ष एकत्र आलो आहोत. एकमेकांवर विश्वास ठेवून आपण महाराष्ट्राला दिशा देणार आहोत. तीस वर्षांपासून मैत्री असलेल्या पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला नाही; मात्र ज्यांच्याशी सामना केला त्या विरोधकांनी माझ्यावर विश्वास दाखवला. आज मी सगळय़ांना धन्यवाद देतो. सगळय़ांचेच आभार मानतो.या सरकारमध्ये एवढे ज्येष्ठ आणि अनुभवी सदस्य आहेत की, महाराष्ट्रात असे सरकार कधीच झाले नसेल असे वाटते असे उद्धव ठाकरे म्हणाले.

166 आमदारांचा पाठिंबा

आघाडीने 166 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र आज राज्यपालांना दिले आणि सत्तास्थापनेचा दावा केला. यावेळी शिवसेना नेते युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, रामदास कदम, विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, सुनील प्रभू, काँग्रेसकडून विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील, मित्र पक्षाचे नेते उपस्थित होते.

आज बाळासाहेब हवे होते!

आजचा दिवस पाहायला बाळासाहेब हवे होते. आज बाळासाहेब असते तर आम्हाला आणखी आनंद झाला असता, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांची एकमताने नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर शरद पवार यांनी आपल्या खास शैलीत या निवडीची घोषणा केली. या वेळी बोलताना त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेबांनी लहानातल्या लहान कार्यकर्त्याला संधी दिली, सामान्य कुटुंबातील कर्तृत्ववान व्यक्तीला राज्यात आणि देशपातळीवर बसवण्याची किमया त्यांनी केली. तीच परंपरा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाकडून पुढे सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राचा कारभार योग्यरीतीने हाकण्यासाठी कर्णधार म्हणून आपण उद्धव ठाकरे यांच्याकडे जबाबदारी सोपवत आहोत. त्यांच्या नेतृत्वात सामान्य कुटुंबातील व्यक्तीची काळजी करणारे सरकार असा विश्वास लोकांच्या मनात निर्माण होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

‘मिस्टर गुपचूप’ आले तसे गेले! एकाकी पडले म्हणून बाहेर पडले!

अजित पवार मंगळवारी रात्री शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी परतले. मात्र शुक्रवारपासून मंगळवारपर्यंत अनेक घटना घडल्या होत्या. अनेक गोष्टी बिघडल्या होत्या. अजितदादांनी बंड करून उपमुख्यमंत्रीपद मिळवले होते. नंतर दोन दिवसांत सोबतचे आमदार पुन्हा राष्ट्रवादीत परतल्याचे लक्षात येताच दादांनी पदाचा राजीनामा दिला. एकाकी पडले म्हणून बाहेर पडले.

अजितदादा भाजपची साथ सोडणार याचे संकेत सोमवारीच मिळाले. विधान भवनात रामराजे निंबाळकर यांच्या दालनात त्यांची आणि छगन भुजबळ, जयंत पाटील यांची तब्बल चार तास बैठक झाली. त्यानंतर त्यांनी मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारणे भाजपला अपेक्षित होते. कारण देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारला होता. मात्र विधान भवनातील बैठक आटोपल्यानंतर आणि दादांची गाडी मंत्रालयाच्या दिशेने न जाता के. सी. कॉलेजच्या दिशेने वळली. त्यांनी पदभार स्वीकारलाच नाही.

आज सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला. अजितदादांचे गटनेतेपद आणि त्यांच्याकडील ‘व्हीप’चे हत्यारही बोथट झाले. त्याच वेळी भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील यांनी अजितदादांची भेट घेतली आणि पुन्हा एकदा मन वळवण्याचा प्रयत्न झाला. त्याशिवाय पवार कुटुंबीयांकडूनही अजितदादांशी फोनवर चर्चा सुरू होती.

बुधवारीच बहुमताचा फैसला होणार असल्याने आता काय करायचे हे ठरविण्यासाठी फडणवीस यांनी ‘वर्षा’वर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली होती. विशेष म्हणजे भाजपच्या या बैठकीत अजितदादाही सामील झाले आणि भाजपचा गेम फसला. या बैठकीतच दादांनी वैयक्तिक कारणास्तव पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र फडणवीस यांच्याकडे दिले आणि त्यांनी पुन्हा आपली गाडी के.सी. कॉलेजच्या दिशेने वळवली.

दरम्यान, अजितदादांनी बंड केल्यापासून शरद पवार यांनी त्यांच्याशी एकदाही संवाद साधला नव्हता. पण सर्व आमदार राष्ट्रवादीसोबतच आहेत हे लक्षात आल्याने बंडाची भाषा बोलणारे दादा थंडावले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आज सकाळी दादांशी चर्चा केल्याचे समजते.

अवघ्या 80 तासांत खेळ संपला

अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या 54 आमदारांच्या सहय़ांचे पत्र पळवले आणि मग भाजपने अजितदादांनाच पळवले. शुक्रवारी रात्रभर राजभवन ते राष्ट्रपती भवनातील दिवे जळत राहिले आणि शनिवारी सकाळी भाजपचे गुपचूप सरकार अस्तित्वात आले. तेव्हापासून देवेंद्र फडणवीस हे आम्ही बहुमत सिद्ध करू असे छातीठोकपणे सांगत होते. मात्र आज 80 तासांनी कारभार आटोपला आणि फडणवीस यांनी रणछोडदास होत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

अजित पवार यांचा पाठिंबा आणि त्यांनी आणलेले पत्र या बळावर बहुमत सिद्ध करू असा विश्वास फडणवीस आणि त्यांच्या भाजपला होता; पण राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी ऐनवेळी पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला त्यामुळे प्लॅन फसल्याचे भाजपच्या लक्षात आले.

तशात सुप्रीम कोर्टानेही दणका दिला आणि अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे तोंडावर आपटलेले भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा देण्याशिवाय पर्याय उरला नाही. संध्याकाळी 4 वाजता गरवारे क्लबमध्ये भाजप आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. तसे निरोपही गेले होते. मात्र तत्पूर्वीच साडेतीन वाजता पत्रकार परिषदेत राजीनाम्याची घोषणा करून फडणवीस यांची गाडी राजभवनकडे वळली.

फडणवीस हे गेल्या 47 वर्षांत पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण करणारे महाराष्ट्राच्या इतिहासातील दुसरे मुख्यमंत्री ठरले होते; पण सत्तालोलुपतेमुळे आता त्यांच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. दुसऱया कार्यकाळात फडणवीस हे फक्त तीन दिवसांचे मुख्यमंत्री ठरले आहेत.

राजीनाम्याची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या गुपचूप सरकार स्थापनेला नैतिक तर ठरवलेच, पण आम्ही घोडेबाजार करणार नाही असे ठरवले होते म्हणून पुरेशा संख्याबळाअभावी राजीनामा देत असल्याचे सांगितले. राष्ट्रपती राजवट हटवल्यानंतर लगेचच गुपचूप शपथविधी का झाला या पत्रकारांच्या प्रश्नावर, ती कायदेशीर गरज होती असे सांगणाऱया फडणवीस यांनी रात्रीत राष्ट्रपती राजवट का उठवली यावर बोलणे मात्र टाळले.