
उद्योग सुधारणा कृती अंमलबजावणीत आंध्र प्रदेशने यंदा पुन्हा टॉपचे रँकिंग पटकावले आहे. देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या यादीत उद्योग आणि देशांतर्गत व्यापारात धडाकेबाज सुधारणांची अंमलबजावणी करीत आंध्रने पुन्हा नंबर वनचे स्थान मिळवल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जाहीर केले आहे.
केंद्रीय उद्योग आणि देशांतर्गत व्यापार विकास विभागाने केलेल्या निरीक्षणात उत्तर प्रदेशने दुसरे तर तेलंगणाने तिसरे स्थान पटकावले आहे. व्यापार सुलभ आणि हायटेक पद्धतीने यशस्वी करण्याच्या उपाययोजनांत आंध्र प्रदेश देशात टॉपवर राहिला आहे अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात देण्यात आली आहे.
काय आहेत रँकिंगचे निकष
देशात उद्योग आणि व्यापार सुधारातील सर्वेत्तम अंमलबजावणीसाठी विविध राज्यांसाठी सुलभ बांधकाम परवाने, उत्तम कामगार व्यवस्थापन नियंत्रण, पर्यावरणीय नोंदणी, माहितीची उत्तम देवाणघेवाण, जमिनीची उपलब्धता आणि परवान्यांसाठी सिंगल विंडो पद्धतीचा वापर हे निकष केंद्रीय अर्थ मंत्रालयाने लावले होते. यंदाही आंध्र प्रदेशने या रँकिंगमध्ये बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि तेलंगणा हि राज्ये आहेत.























































