
आम्ही काही देशविरोधी जमात नाही. जम्मू-कश्मीरमधील नागरिकांना त्यांचे अधिकार पुन्हा मिळवून देणे हाच आमचा प्रमुख उद्देश आहे. धर्माच्या नावावर आमच्यात फूट फाडण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. ही कोणत्याही धर्माची लढाई नाही. आम्ही देशाविरोधात नसून भाजप विरोधी असल्याची ठाम भूमिका फारुक अब्दुला यांनी जाहीर केली.
जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा महबूबा मुफ्ती यांच्या निवासस्थानी ‘पीपल्स अलांयस फॉर डिक्लेरेशन’ (गुपकार डिक्लेरेशन)ची विशेष बैठक पार पडली. यावेळी गुपकार डिक्लेरेशन घोषणा करण्यात आली. त्यावेळी बोलताना फारुक अब्दुला यांनी भूमिका जाहीर करताना पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. या डिक्लेरेशनमध्ये एकूण 6 राजकीय पक्षांचा समावेश करण्यात आला आहे. फारुक अब्दुला यांना या डिक्लेरेशनचे अध्यक्षपद देण्यात आले असून महबूबा मुफ्ती यांना उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर सज्जाद लोन यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या बैठकीनंतर बोलताना सज्जाद लोन म्हणाले की, जम्मू-कश्मीरचा झेंडा हा या युतीचे प्रतीक असणार आहे. 17 नोव्हेंबर रोजी श्रीनगर येथे एक संमेलन होणार असून त्यानंतर दोन आठवडय़ानंतर एक बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
मुफ्ती यांच्या वक्तव्यानंतर राजकारण तापले
पीडीपीच्या अध्यक्षा महबूबा मुफ्ती यांनी नुकतेच तिरंगासंदर्भात एक वक्तव्य केले होते. त्यावरुन जम्मू-कश्मीर येथील राजकारण तापले असून मुफ्ती यांना अटक करण्याची मागणी जम्मू येथील भाजपकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात भाजपचे जम्मूचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना म्हणाले की, आम्ही उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्याकडे महबूबा यांना अटक करण्याची मागणी केली असल्याचे यावेळी सांगितले.



























































