>> सावित्री जगदाळे
कवयित्री जबिन शेख यांचा ‘नदी आणि मी’ हा काव्यसंग्रह हातात पडला तेव्हा खूप उत्सुकता लागून राहिलेली. नदी या विषयावरची ही कवितांची मालिका म्हणजेच थीम कविता कशा असतील, एकाच विषयावर अनेक कविता लिहिणं, अगदी संग्रह काढण्याइतपत मोठं अवघड काम. प्रस्तावनेत लेखक, समीक्षक, कवी डॉ. संजय बोरूडे यांनी म्हटलेच आहे, ‘एकाच विषयावर कविता लिहिताना त्या विषयाचे सर्वकष आकलन, चिंतन, मनन तसेच कविता फॉर्मचा नीट अभ्यास असावा लागतो.’ या कविता वाचल्यावर याची प्रचीती येते. कवयित्रीने या विषयाला न्याय दिला आहे असे वाटते. नदीकिनारी मानवाने वसाहती स्थापन केल्या. नदीकिनारी मानवीय संस्कृती वाढली, घडली, फुलली. हिंदुस्थानी संस्कृतीत तर नदी तीर्थ झाली आहे. ती जीवनदायिनी आहेच, पण पापक्षालिनी आहे असा समज आहे. अध्यात्मिकदृष्टय़ा नदीला समाज जीवनात पवित्र स्थान आहे. अनेक नद्यांच्या संगमावर महत्त्वाची तीर्थक्षेत्रे वसली आहेत. असे व्यापक, विस्तृत स्वरूप नदीला प्राप्त झाले आहे. कवयित्रीला या ठिकठिकाणी भेटणाऱया नदीने सातत्याने उबदार मैत्रभाव मिळवून दिला आहे. खळखळणारे पाणी पाहूनच मन उल्हसित होते. तासन्तास नदीकिनारी पाण्यात पाय टाकून बसले की लुचणारे मासेही ओळखीचे होतात. नदीमय आपे मनही होतेच होते. जनमानसात नदीही माय, माता असते. अंगाखांद्यावर जोजवणारी, वात्सल्याने खळाळणारी, बाल्य जोपासणारी आईची आई असते. तिच्या प्रभावाने आयुष्यातील चढ-उतार तरणे शक्य होते. तिची साथ मनाच्या खोल गाभाऱयात झरत राहते. मनाचा तळ आणि नदीचा तळ सारखा वाटू लागतो. असे नदीचे अस्तित्व तनमनात खोलवर गडद गहिरे रुजलेले असते. कवयित्री जबिन शेख यांची या संग्रहातील पहिलीच कविता,
ऐक सये ग़ं, गीत नवे हे
गुज मनीचे सांगते
ही कविता वाचूनच नदी ही कवयित्रीची जीवलग सखी आहे, हे लक्षात येते. मनीचे गुज सांगता सांगता ती नदीला प्रश्नही विचारते – कोण जागते मनात माझ्या कशी समजू मी तरी? मनाचा तळ असा कधी कधी स्वतःलाही नीट अवलोकन होत नाही. आकळत नाही. मन मात्र बेचैन होते. जिवाला चैन नसते. तेव्हा सखीच ही अवस्था, अस्वस्थता जाणेल, ओळखेल. अशी दोघींची नितळ, निखळ, पारदर्शी मैत्री आहे. ‘तुझ्या प्रत्येक वळणावर, मीच मला भेटत गेले’ असे दोघींचे सख्य आहे. या मैत्रभावानेच कधी कधी लटक्या रागाने कवयित्री म्हणते, ‘तू तुझ्यातच मग्न’ तिचे आपल्याकडे लक्ष नाही तेव्हा तिच्यावर रुसणे, तिने रुसवा काढावा ही मनीषा बाळगणे आलेच. जवळच्या नात्यातच हे शक्य आहे.
‘भीती वाटते मला,
माझ्याच दुथडी भरून वाहण्याची’
बाईने कसे खालमानेने जगावे, हसणे, बोलणे मर्यादेत असावे अशी आपली सामाजिक रचना आणि बाईंकडून तशा वागण्याची अपेक्षा, पण मनाला आवर कसा घालायचा? ते तर दुथडी भरून वाहतेय. साहजिकच सगळ्यांच्या नजरा रोखलेल्या राहतील. नजरेत विखार, विस्मय, द्वेष, तिरस्कार असणार म्हणूनच स्वतःतल्या नदीने आनंदाने, खळाळून, दुथडी भरून वाहताना भीती वाटते. नदीविषयी कवयित्रीची भावना या ठिकाणी तूच मी/मीच तू अशी झाली आहे. भावनात्मक मिलन झाल्यामुळे ती नदीला वेगळी समजतच नाही. ती स्वतः नदी होते किंवा नदीमय होते. या नदीला मग पाऊस साजण, प्रियकर वाटू लागतो. कवयित्री नदीला विचारते,
‘तुझ्या काठावर कोण कोण आले
आणि मला कुणी शोधले का?’
हा प्रश्न नदीला किंवा स्वतःला विचारताना कवयित्रीला वाटत असते, आपल्याला कोणीतरी शोधावे, आपल्या मागे मागे यावे, आपल्या अस्तित्वाची दखल घ्यावी अशा प्रकारची प्रत्येक जिवाची आस असते. आपले अस्तित्व दखलपात्र व्हावे त्यासाठी अस्वस्थ, अशांत राहते मन. एकाकी मनाला कुणाची तरी सोबत असावी वाटते. अशा या प्रवाही, नदीमय मनाला एका वळणावर अनंत लाटांनी उसळणारा, अथांग, धीरगंभीर गर्जना करणारा स्वतःत सामावून घेणारा अगाध समुद्र भेटतो. समर्पण भावनेने नदी समुद्रात विसर्जित होते. नदीचे शांतवणे नदीमय भाव कवितेतून गाजत राहतात.
नदीपात्रातील वाळू नेणारे लुटारू हा नेहमीच गंभीर विषय राहिला आहे. शासनाच्या डोक्यावर आणि डोळ्यावर झापडे बांधली आहेत. नदीचे पाणी वाळूमुळे शुद्ध, शुचिर्भुत राहते. हे त्रैकालिक सत्य. नदीच्या वाहण्यामुळे ती शुद्ध होते, पण वाळूच नसेल तर नदीचे डबके होते. पृथ्वीच्या जन्मापासून, नदीच्या उगमापासून वाळूचे अस्तित्व आहे, पण विसाव्या, एकविसाव्या शतकात अफाट प्रगतीने हे लाखो वर्षांचे संचित सिमेंटच्या जंगलात मृत होऊ लागलेय. या जीवनदायीनीला डबक्याचे, गटाराचे रूप देऊन संबंधित लोक गडगंज झालेत. पर्यावरणाचा असा सगळीकडून विनाश, विद्ध्वंस होऊ लागलाय. या भयाण वास्तवामुळे कुठलेही संवेदनशील आक्रंदून उठते. नदीवर पडलेला घाव, चिघळणाऱया जखमा यांच्या वेदना आपल्याच आहेत असे कवयित्रीला वाटत राहते. यातूनही चांगले घडण्याची तिला आशा वाटते. पुन्हा वाळू रेतींनी पात्र भरेल आणि नदी खळाळत वाहील. नदीला पूर येतो तेव्हा किनाऱयावरचे सगळे जीव, जगणेच नदी कवेत घेऊन जाते. तेव्हा कवयित्री नदीला सखी न म्हणता कोपलेली आदिमाया म्हणते. ती नदीला आर्जवे करते, विनविते, ‘तू जीवन फुलव, उद्ध्वस्त करू नकोस. बायाबापडय़ांच्या डोळ्यातल्या गंगा-जमुना पाहून तरी तुला दया येऊ दे.’
अशी प्रार्थना सकळ जनातल्या अंतर्मनाची आहे. ही आर्तता विश्वव्यापी आहे. जिवाभावाच्या जिवलगांनाच आपण असे खडसावू शकतो, चार शब्द सुनावू शकतो. धरणे बांधल्यामुळे काही थोडय़ा लोकांचे कल्याण होते, पण कितीतरी लोकांच्या जमिनी जातात. पिढय़ान्पिढय़ांचे गाव बुडते, पाण्याखाली जाते. धरणाच्या फुगवटय़ामुळे जमिनीत दलदल माजते, जमिनी खारवटतात. नदीचे प्रवाहीपण अखंडित राहत नाही. नदीवरचा हा अत्याचार कल्याणकारी की विनाशकारी हे काळच ठरवेल.
एका कवितेत नदीच म्हणते,
‘थांब, काठावरच थांब. मी दुसऱयाची तहान भागवत असली तरी मला मात्र रक्ताची तहान आहे. माझं पाणी रक्त तृष्णा घेऊनच वाहते. माझ्या पाण्यातील भोवरे, डोह, गाळ अतृप्त आहे. तू नको येऊस इथे आत खोल. काठावरच थांब. ही नदीची क्रौर्य बाजूही कवितेत मांडली आहे. निसर्ग वरवर कितीही सुंदर वाटला तरी मूलतः तो तटस्थ असतो, अलिप्त असतो. तसाच थंड क्रूरही असतो. त्याच्याशी नीट, न्यायाने वागले तर तोही अन्याय करत नाही. आक्रमण, अत्याचार केले तर मात्र क्रोधीत होऊन बळी घेतो. याची प्रचीती नेहमीच सगळ्यांना येते. ‘नदी आणि मी’ या काव्यसंग्रहात या दुसऱया बाजूही मांडल्या आहेत.
नदी ही जीवनदायिनी असली तरी ती क्रुद्ध होते आणि मोठा विध्वंस घडवते तेव्हा कसलीही दयामाया दाखवत नाही. पुरातून सगळा किनारा बरोबर वाहून नेते. संथ वाहणारी, खळखळ धावणारी, झुळझुळ झरणारी नदी जिवाला शांतवत असली तरी तिच्या काठावर मानवाने केलेले आक्रमण, अतिक्रमण याचा परिणाम होऊन असेल कदाचित ती रौद्र रूप धारण करते तेव्हा तिच्यावर कुणाचाच ताबा राहत नाही. अतिप्रगत माणूसही हतबल होतो. तरीही मनुष्य प्राण्याला सगळ्यावर मात करण्याची, विजय मिळवण्याची हवस अतोनात आहे. या हव्यासापोटी पर्यावरणाचा ऱहास होऊ लागलाय. त्यात जीवनदायिनी नदीही आहेच.
संवेदनशील मनातला सल शब्दाद्वारे, आपल्या कलेद्वारे व्यक्त होतो. यामुळे समाजावर, शासनावर काही सकारात्मक परिणाम झाला तर चांगलेच आहे. ‘नदी आणि मी’ या काव्यसंग्रहाला लेखक, समीक्षक, कवी डॉ. संजय बोरुडे यांची प्रस्तावना लाभली आहे. साहित्याक्षर प्रकाशनाने उत्कृष्ट निमिर्ती करून हा काव्यसंग्रह दर्जेदार असा केला आहे. सरदार यांचे मुखपृष्ठ साजेसे आहे.
नदी आणि मी
कवयित्री – जबिन शेख
प्रकाशक – साहित्याक्षर प्रकाशन, संगमनेर
पृष्ठ- 88, मूल्य – रुपये 120/-





























































