दहशत माजविण्यासाठी सोमवार पेठेत टोळक्याचा राडा, दोघांवर कोयत्याने वार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हातात कोयते घेऊन दोघांवर वार करून दहशत माजविणाऱ्या दोघांना समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचे चार साथीदार फरार झाले आहेत. ही घटना काल पुण्यातील सोमवार पेठेतील सदानंदनगरमध्ये घडली.

चेतन संजय चव्हाण (वय – 21, रा. मंगळवार पेठ) आणि संकेत अनंत तारू (वय – 21, रा. कसबा पेठ ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रहीम कुरेशी (वय – 23, रा. मंगळवार पेठ ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

काल संध्याकाळच्या सुमारास स्वयंघोषित भाई चेतन आणि इतर साथीदार हातात कोयते घेऊन सोमवार पेठेत गेले. त्यावेळी रहिमी त्यांचे मित्र रफिक शेख, अल्ताफ इनामदार, उमर शेख, बुरहान शेख यांच्याशी गप्पा मारत बसले होते. टोळक्यातील चेतनने रहीमला मी इथला भाई असताना सुद्धा तू मला नेहमी खुन्नस देतो, असे म्हणत रहीमवर कोयत्याने वार केला.

भांडण सोडविण्यासाठी मधे आलेल्या रफिक आणि अल्ताफ यांनाही आरोपींनी मारहाण केली. त्यानंतर परिसरात जोरजोरात आरडा-ओरडा करून हवेत कोयते फिरवत दहशत माजविली. त्यामुळे पसिरातील नागरिक सैरावैरा पळत होते. त्याशिवाय दुकानादारांनी दुकाने बंद केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे तपास करीत आहेत.