
रोजच्या रूटीनमधून वेगळे काही करण्याची संधी मिळाल्याची भावना ‘संक्रांत क्वीन’ या स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांनी व्यक्त केली आहे. फोटो पाठवण्याच्या पहिल्या फेरीनंतर रॅम्प वॉकच्या फेरीसाठीदेखील महिलांनी उत्तम प्रतिसाद दिला. या फेरीतून निवडून आलेल्या 60 महिलांमध्ये आता चुरस आहे ती टॉप 10 मध्ये निवडून येण्याची आणि त्याही पुढे जाऊन संक्रांत सोहळा क्वीन होण्याची.
मिती क्रिएशन्स आणि व्रॅव्हॉन हलदी तुलसी ड्रॉप्स आयोजित संक्रांत सोहळा या यंदाच्या डिजिटल स्पर्धेच्या दुसऱया फेरीत निवड झालेल्या महिलांसाठी एक ग्रुमिंग सेशन पार पडले. व्रॅव्हॉनच्या डॉ. स्मिता रास्ते आणि अभिनेत्री, नयापन क्रिएशन्सच्या वनश्री पांडे यांनी हे ग्रुमिंग सेशन घेतले.
महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, आंतरिक सौंदर्य कशा प्रकारे खुलवावे, महिलांना सर्वसामान्यपणे उद्भवणाऱया आरोग्याच्या तक्रारींवर मात कशी करावी या सर्व गोष्टींविषयी डॉ. स्मिता रास्ते यांनी मार्गदर्शन केले. तर महिलांनी आपला आत्मविश्वास कसा वाढवावा, आपले व्यक्तिमत्त्व कसे खुलवावे, आपल्या शरीरयष्टीप्रमाणे साजेसे कपडे कसे घालावे याविषयी वनश्री पांडे यांनी माहिती दिली. या ग्रुमिंग सेशनमुळे महिलांना फक्त स्पर्धेपुरतेच नव्हे तर रोजच्या जगण्यातही फायदेशीर ठरेल असे मार्गदर्शन मिळाले, असे मिती क्रिएशन्सच्या व्यवस्थापकीय संचालिका उत्तरा मोने यांनी सांगितले.
स्पर्धेच्या विजेत्यांना आणि सहभागी महिलांना अनेक आकर्षक बक्षिसेदेखील मिळणार आहेत. ईशा टूर्सतर्फे विजेतीला लडाखची मोफत टूर तर इतर स्पर्धकांना काही गिफ्ट व्हाऊचर्स, व्रॅव्हॉनतर्फे आकर्षक गिफ्ट हॅम्पर्स, ठाण्याच्या नगरसेविका नंदिनी विचारे यांच्याकडून विजेतीला मानाची पैठणी मिळणार आहे.
इतर स्पर्धकांना साडय़ा, कालनिर्णयतर्फेदेखील भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. त्याचबरोबर अशोक खामकर मसाले यांच्याकडूनदेखील स्पर्धकांना आकर्षक गिफ्ट हॅम्पर्स मिळणार आहेत. ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकांमधील आपले लाडके कलाकारदेखील या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. माध्यम प्रायोजक म्हणून ‘सामना’ वृत्तपत्राचीदेखील जोड स्पर्धेला मिळाली आहे.
21 फेब्रुवारीला अंतिम सोहळा
‘कलर्स’ मराठीवरील कलाकारांच्या आणि काही मान्यवरांच्या उपस्थितीत संक्रांत सोहळा या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा येत्या 21 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता मिती ग्रुपच्या फेसबुक पेजवर सादर होणार आहे. हा सोहळा ऑनलाइन असल्याने जगभरातील प्रेक्षक या सोहळ्याचा आनंद घेऊ शकतील, असेही उत्तरा मोने यांनी सांगितले.

























































