
पुढील महिन्यात होणाऱया जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी ‘टीम इंडिया’तील खेळाडूंनी बायो-बबलमधील जीममध्ये कसून मेहनत करायला सुरुवात केली आहे. ‘बीसीसीआय’ने याबाबतचा एक व्हिडिओच सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात इशांत शर्मा, मोहम्मद शमी, रिषभ पंत यांच्यासह सर्व इतर खेळाडू वर्क-आऊट करताना दिसत आहेत. ‘बीसीसीआय’ने या व्हिडिओला ‘आम्ही वेळेनुसार आणखी मजबूत होत चाललोय’ अशी कॅप्शन देऊन प्रतिस्पर्धी न्यूझीलंड संघाला इशारा दिला आहे.
हिंदुस्थानच्या महिला व पुरुष संघाला आगामी महिन्यात इंग्लंडच्या दौऱयावर जायचे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून बहुतांश खेळाडू 19 मेपासून मुंबईत क्वारंटाईन झाले आहेत. कर्णधार विराट कोहली व अजिंक्य रहाणेसह काही क्रिकेटपटू 24 मे रोजी बायो-बबलमध्ये दाखल झाले आहेत. उशिरा आलेल्या खेळाडूंना आधीच्या संघ सहकाऱयांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे. उशिरा आलेल्या खेळाडूंच्या वर्क-आऊटसाठी वेगळी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
क्रिकेटपटूंसाठी कडक व्यवस्था
आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोरोना घुसल्यामुळे ही टी-20 स्पर्धा स्थगित करावी लागली. या कटू अनुभवामुळे या वेळी ‘बीसीसीआय’ने खेळाडूंसाठी कडक व्यवस्था केली आहे. हॉटेलमधील कर्मचाऱयांना मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. साफसफाईमध्ये कुठलीही कसर सोडण्यात आलेली नाही. व्हिडिओमध्ये इशांत, शमी व पंतसह शुभमन गील, मोहम्मद सिराज, आवेश खान, अभिमन्यू ईश्वरन, उमेश यादव, मयांक अग्रवाल व शार्दूल ठाकूर हेदेखील जीममध्ये सराव करताना दिसले. मुंबईमध्ये खेळाडूंना मैदानावर सराव करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. 2 जूनला हिंदुस्थानचे महिला व पुरुष संघ इंग्लंडला रवाना होतील. तेथे गेल्यावरही ‘टीम इंडिया’ला दहा दिवस क्वारंटाईन रहावे लागेल. मात्र तीन दिवसांच्या कडक क्वारंटाईन कालावधीनंतर क्रिकेटपटूंना मैदानावर सराव करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. 18 ते 22 जून दरम्यान हिंदुस्थान-न्यूझीलंड दरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार आहे.
लसीच्या दुसऱया डोसची तयारी
4 ऑगस्टपासून हिंदुस्थान व इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. हिंदुस्थानी क्रिकेटपटूंनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेला आहे. ‘बीसीसीआय’ने दुसऱया डोससाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी चर्चा केलेली आहे. त्यामुळे सर्व खेळाडूंना इंग्लंडमध्येच लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.

























































