इंजिनीअरिंग आता मराठीतही करता येणार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अर्थात ‘सीओईपी’ आणि पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, निगडी या पुण्यातील दोन स्वायत्त महाविद्यालयांत अभियांत्रिकीचे पदवी अभ्यासक्रम मराठी माध्यमांमध्ये सुरू करण्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सोमवारी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना मराठी भाषेतून अभियांत्रिकी शिक्षण मिळणे शक्य होणार आहे. अभियांत्रिकी शिक्षणासाठी शिखर संस्था असलेल्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने  (एआयसीटीई) मराठी, हिंदी, बंगाली, तेलुगू, तमिळ, गुजराती, कानडी आणि मल्याळम या भाषांतून शिक्षण देण्याचे सूचित केले होते. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी इंग्रजीच्या भीतीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणाची संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ‘एआयसीटीई’ने हा निर्णय घेतला आहे.

पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने सीओईपीच्या तीन अभ्यासक्रमांना, पिंपरीचिंचवड ऑफ इंजिनीअरिंगच्या एका अभ्यासक्रमास मराठी माध्यमामध्ये सुरू करण्याची मान्यता दिली आहे. त्यासंबंधीचे परिपत्रक सोमवारी शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव एम. व्ही. रासवे यांनी काढले आहे.  यापूर्वीच एआयसीटीईने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देशभरातून 14 महाविद्यालयांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यात राज्यातून मराठी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी सीओईपी, पुणे आणि पिंपरीचिंचवड इंजिनीअरिंग कॉलेजांनी प्रस्ताव पाठविला होता.मराठीतून अभियांत्रिकीसाठी साहित्य निर्माण केले जाईल.

साहित्य अन् संदर्भ पुस्तकेच नाहीत

सीओईपीने मराठी माध्यमातून तीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, महाविद्यालयाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत मराठीतून अभियांत्रिकीचे शिक्षण देत असताना त्या पद्धतीचे साहित्य उपलब्ध नसल्याचे दिसून आले. त्यामुळे सुरुवातीला मराठीतून अभियांत्रिकीसाठी साहित्य निर्माण केले जाईल. त्याच पद्धतीने संदर्भ पुस्तके उपलब्ध केली जातील. त्यामुळे यंदाच्या वर्षी हा अभ्यासक्रम सुरू केला जाणार नसल्याची माहिती सीओईपीचे संचालक बी. बी. आहुजा यांनी दिली.