नारायण राणे यांचे मनस्वास्थ्य सुधारावे यासाठी शिवसेना प्रार्थना करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मनस्वास्थ्य सुधारावे यासाठी शिवसेना दररोज एक मिनिट ईश्वराकडे प्रार्थना करील. भाजपनेसुद्धा हे करावे, अशी उपरोधिक टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली.

नाशिक येथे ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेना, भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, एकमेकांवर दगडफेकीपर्यंत गेले हे होणं मला पटलं नाही. शिवसेनेला त्यातून फार आनंद मिळाला नाही. आमच्यात राजकीय मतभेद नक्कीच आहेत. अचानक एखाद्या व्यक्तीमुळे आमचं हिंदुत्वाचं, राष्ट्रीयत्वाचं नातं पूर्ण तुटून जातंय असं वातावरण निर्माण झालं. हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पटलेलं नाही. एका व्यक्तीमुळे हे झालं याचं दुःख आहे. निवडणुकांमध्ये एकमेकांविरुद्ध उभे राहू, पण हे असं होणं योग्य नाही. नारायण राणे आज जे बोलत आहेत त्याचा त्यांना आयुष्यात पश्चाताप होईल. मला कसा वापरून घेतला हे त्यांना कळेल ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

नारायण राणे यांची सातत्याने जीभ घसरतेय त्याबाबत त्यांना आणि त्यांच्या सध्याच्या पक्षाला आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे हे भाजपला भविष्यात समजल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले. राणे हे मंत्री झाल्यापासून हा पक्ष रोज दहा फूट मागे जातोय, पुढल्या काही दिवसांत तो अर्ध्या फुटावर येईल. आम्हाला कुंडल्या काढू, असे धमकावण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला कुंडल्या नाहीत का? आज आमच्यावर जे बोलायचे ते बोला, पण ज्या दिवशी आम्ही आमची संदूक उघडू आणि त्यातून जे बाहेर येईल त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा इशाराही त्यांनी नारायण राणे यांना दिला.

भाजपमध्ये व आमच्यात वैचारिक मतभेद आहेत, त्यांच्याशी आमचं भांडण असेल. नारायण राणे यांना आम्ही भाजपवाले मानतच नाही. भाजप त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमच्यावर हल्ला करणार असेल तर आमच्याकडेही खूप खांदे आहेत. ते नुसत्या बंदुका ठेवायला नाहीत तर उचलायलाही आहेत. राजकारणात खांदा देणे याचा अर्थ पराभव असा असतो. राजकीय खांदा द्यायला आम्ही समर्थ आहोत. यामुळेच राणेंचा कोकणात दोनदा आणि वांद्रय़ात एकदा पराभव झाला. लोकशाहीत हीच लढाई असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आमची संदूक उघडू तेव्हा सामोरे जाण्याची तयारी ठेवा

कुंडल्या काढण्याच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही. तुम्हालाही कुंडल्या आहेत. तुम्ही आज आमच्यावर काय बोलायचे ते बोला, पण ज्या दिवशी आम्ही आमची संदूक उघडू तेव्हा जे बाहेर पडेल त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा इशारा संजय राऊत यांनी नारायण राणे यांना दिला.

कणकवलीत राणेंना शॉक

कणकवली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आज कणकवलीत विजेचा हलकासा शॉक लागला. जनआशीर्वाद यात्रा येथे आली असता छत्रपती शिवरायांच्या पुतळय़ाला हार घालण्यासाठी राणे व्यासपीठावर जात होते. त्याच वेळी तेथे विद्युत रोषणाई केलेल्या लोखंडी खांबाला त्यांचा हात लागला आणि त्यांना विजेने झटका दिला. हा प्रकार पॅमेऱयात पैद झाला.