बीडमध्ये खरीप हंगाम वाहून गेला; पाच लाख हेक्टर क्षेत्र पाण्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सलग चार दिवसाच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. हातचे पीक होत्याचे नव्हते झाले. मुसळधार पावसाने बीड जिल्ह्याची दाणादाण उडवून दिली. बहरलेला खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. बीड जिल्ह्यात पाच लाख हेक्टरवरील खरीप सध्या पाण्यात आहे. कापूस, सोयाबीन ही पिके नेस्तनाबूत झाली आहेत. तर ऊसाच्या पिकातही पाणी शिरले आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी बुधवारी सकाळपासून महसूल प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले आहे.

खरीपाची दुरावस्था बघून शेतकरी कोलमडून गेला आहे. बीड जिल्ह्यामध्ये सलग चार दिवसांच्या पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. डोंगरपट्ट्यापासून सखल भागापर्यंत पावसाचा जोर कायम होता. नदी, नाले भरून वाहू लागली. यात जमिनीही वाहून गेल्या, पुराचे पाणी शेतामध्ये शिरले. धरणाशेजारी असणाऱ्या विहिरी ओव्हरफ्लो झाल्या. पाण्याचा प्रवाह गावात शिरला, पावसाचे पाणी जमिनीत मावेना अशी भयंकर परिस्थिती चार दिवसाच्या पावसाने निर्माण झाली. धुवाधार पावसाने खरीप हंगाम वाहून गेला आहे. मूग, उडीद हे पिके काही प्रमाणात हातात पडली होती. मात्र उर्वरित मूग, उडीद या पिकांसह ऊस, कापूस ही प्रमुख पिके नेस्तनाबूत झाली आहेत. उभ्या बाजरीचे पिक जमिनदोस्त झाले आहे. सोयाबीन, बाजरीला कोंब फुटू लागले आहेत. कापूस पाण्यात आहे, बोंडे सडू लागली आहेत. अनेक गावांमधील शेती वाहून गेली आहे. या पवासाने बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड नुकसान झाले आहे.

पशुधनाचे नुकसान
जोरदार पावसाने नद्यांना पूर आला, पुराच्या पाण्यात बीड जिल्ह्यातील गावागावातील पशुधन वाहून गेले आहे. बीड शहरातील बिंदुसरा नदीला पूर आल्यानंतर मंगळवारी रात्री पुलावरून वाट काढत जाणारी 10 ते 12 जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. माजलगाव तालुक्यातही जनावरे वाहून गेली आहेत. गेवराई तालुक्यातील तलवाडा भागात तीन जनावरे वाहून गेली आहेत.

एकाचा मृतदेह सापडला
कपिलधारचा धबधबा पाहाण्यासाठी गेलेले दोन तरूण पुलावरील पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. यातील एका तरूणाला वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले होते. मात्र दुसरा तरूण बेपत्ता होता. त्याचा मृतदेह बुधवारी सकाळी कपिलधार परिसरातील शेतामध्ये सापडला आहे.

महसूल प्रशासन बांधावर
मुसळधार पावसाने बीड जिल्ह्याची वाताहत झाली आहे. शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला आहे. बीड जिल्ह्याची वाटचाल ओल्या दुष्काळाकडे आहे. झालेल्या नुकसानीची पाहणी आणि पंचनामा करण्याचा आदेश शासनाने दिले आहेत. बुधवारी सकाळपासूनच बीड जिल्ह्यातील महसूल प्रशासन गावागावातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले आहे. पंचनामा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

शेतकरी हतबल
मोठ्या हिमंतीने शेतकऱ्यांनी खरीप हंगाम जोपासला सोयाबीन, कापूस, य नगदी पिकाला प्राधान्य देत खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी मोठी मेहनत घेतली. आधी महिनाभर ओढ दिलेल्या पावसाने नंतर बीड जिल्ह्याला झोडपून काढले. यात हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला. पदरात पडणारी पिके नेस्तनाबूत झाल्याने शेतकरी चिंतातूर आणि उदास झाला आहे. खरीप पिकांची वाताहत बघून शेतकरी हतबल झाला आहे.