
>> प्रसाद ताम्हनकर
जगभरातील अनेक कथित ‘सायबर सिक्युरिटी कंपन्या’ मोबाईलची सुरक्षा, तुमच्या गोपनीय माहितीची सुरक्षा, मोबाईलवर तुमचे पूर्ण नियंत्रण देणारी यंत्रणा अशा विविध जाहिरातींखाली शून्य उपयोग असलेले आपले उत्पादन विकत आहेत. ही स्वयंघोषित उत्पादने खरंच तुमच्या मोबाईलला पूर्ण सुरक्षा देऊ शकतात का? हे पाहायला हवे.
काही काळापूर्वीच ’पेगॅसस’ सॉफ्टवेअर अचानक चर्चेत आले होते. या सॉफ्टवेअरच्या मदतीने कोणताही स्मार्टफोन, मग तो अॅण्डॉइड असो वा आयफोन… सहजपणे हॅक करून, त्यातील मेसेजेस वाचता येणे, कॉल्स रेकॉर्ड करणे, व्हिडीओ, फोटो बनवणे अगदी सहजशक्य असल्याचे समोर आले. मुख्य म्हणजे, ज्याच्या मोबाईलमधून हे सगळे पळवले जाते त्याला याची कानोकानदेखील खबर लागत नाही. या सॉफ्टवेअरच्या मदतीने आपल्या हिंदुस्थानातदेखील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींवर केंद्र सरकारकडून पाळत ठेवली जात असल्याचा आरोपदेखील करण्यात आला.
या प्रकारचे सॉफ्टवेअर काही मोजक्या देशांकडे असल्याची जगातील प्रमुख संरक्षण संस्थांची खात्री होती. मात्र आता अशा प्रकारची सॉफ्टवेअर जगातील अनेक लहानमोठय़ा देशांबरोबर, काही अतिरेकी संघटना आणि विविध संस्थांकडेदेखील पोचल्याचे उघड होत आहे. अशा प्रकारच्या सॉफ्टवेअरच्या मदतीनं कोणत्याही मोबाइलच्या कॅमेरा आणि मायक्रोफोनलादेखील हॅक करणे शक्य असल्याने यामागचा खरा धोका आता जगाच्या चिंतेत जास्ती भर घालत आहे.
या सगळय़ा घटनाक्रमानंतर जगभरातील मोबाईल ग्राहकांमध्ये आपल्या मोबाईलच्या सुरक्षेसंदर्भात जागृती वाढलेली आहे. प्रत्येक जण आपल्या वैयक्तिक माहितीच्या आणि मोबाईलच्या सुरक्षेसाठी अधिक जागरूक बनत चालला आहे. त्यातच सतत मोठमोठय़ा टेक कंपन्या, मोबाईल कंपन्या यांच्याकडून ग्राहकांच्या गोपनीय माहितीचा होत असलेला गैरवापर, अनेक मोबाईलमध्ये होत असलेले हॅकिंग, ग्राहकांची माहिती चोरून त्यांच्या बँक खात्यांवर मारले जात असलेले डल्ले या बातम्यांमुळे सामान्य मोबाईल वापरकर्त्यांच्या चिंतेत सतत भर पडत चालली आहे. याचाच फायदा काही तंत्रज्ञान सुरक्षा क्षेत्रातील कंपन्यांनी उचलला असून, ग्राहकांना ‘मोबाईल सुरक्षे’च्या नावाखाली टोप्या घालण्याचा धंदा जगभरात जोमाने सुरू झालेला आहे.
नुकताच अमेरिकेत एक ‘सर्व्हे’ करण्यात आला. त्यात 50 टक्के लोकांनी मोबाईलच्या माध्यमातून सरकार आपल्यावर नजर ठेवून असल्याची भीती व्यक्त केली, तर 72 टक्के लोकांनी आपल्या मोबाईलच्या आडून अनेक टेक आणि सोशल मीडिया कंपन्या आपल्या खासगी माहितीवर लक्ष ठेवून असल्याचा खात्रीशीर दावा केला आहे. लोकांच्यात पसरलेल्या या भीतीचा गैरफायदा घेण्यास सध्या अनेक कंपन्या सज्ज झाल्या आहेत.
जगभरातील अनेक कथित ‘सायबर सिक्युरिटी कंपन्या’ मोबाईलची सुरक्षा, तुमच्या गोपनीय माहितीची सुरक्षा, मोबाईलवर तुमचे पूर्ण नियंत्रण देणारी यंत्रणा अशा विविध जाहिरातींखाली शून्य उपयोग असलेले आपले उत्पादन विकत आहेत. विशेष म्हणजे, अशा उत्पादनांना जगभरातून अनेक लोक प्रतिसाददेखील देत आहेत.
ही स्वयंघोषित उत्पादने खरंच तुमच्या मोबाईलला पूर्ण सुरक्षा देऊ शकतात का? मोबाईल सुरक्षा क्षेत्रातील तज्ञ मात्र यासंदर्भात वेगळे मत व्यक्त करतात. त्यांच्या मते, तुमचा मोबाईल नक्की काय काम करतो, तुम्ही त्यात ठेवलेले अनेक अॅप्लिकेशन नक्की काय काम करतात, त्या अॅप्लिकेशन्सना तुम्ही मोबाईलमधील कोणत्या सुविधा वापरायची परवानगी दिली आहे याबद्दल जोवर तुम्हाला स्वतःला पूर्ण माहिती नसेल तोवर कोणतेही सुरक्षा सॉफ्टवेअर तुम्हाला 100 टक्के सुरक्षा प्रदान करू शकणार नाही. तुम्ही वेगवेगळय़ा अॅप्लिकेशन्सना जितका अॅक्सेस देता, तेवढा तुमचा मोबाईल जास्त असुरक्षित होत जातो.
तज्ञांच्या मते, जे मोबाईल वापरकर्ते इंटरनेटचा वापर करतात, त्यांच्यावर जास्ती नजर ठेवण्यात येते. ते कोणत्या वेबसाइटला भेट देतात, कोणत्या प्रकारचे व्हिडीओ बघतात यावर टेक आणि सोशल कंपन्या नजर ठेवून असतात. याचे साधे उदाहरण म्हणजे, तुम्ही गुगलवर एखादे उत्पादन जसे की, टीव्ही, वॉशिंग मशीन, इस्त्री सर्च केलेत तर जेव्हा तुम्ही त्यानंतर सोशल मीडियावर जाता, तेव्हा तुम्हाला हमखास तुम्ही सर्च केलेल्या उत्पादनांच्याच जाहिराती दाखवल्या जातात. याचाच अर्थ, तुम्ही केलेल्या साध्या ‘सर्च’वरदेखील अनेकांची नजर खिळलेली असते आणि त्याचा वापर ते स्वतःच्या व्यापारासाठी करून घेत असतात.
जगभरातील या तज्ञांच्या मतांचा नीट अभ्यास केला तर एक गोष्ट नक्की आहे, की कोणताही ‘सिक्युरिटी’ नावाने येणारा ‘देवदूत’ तुमच्या मोबाईलला आणि त्यातील माहितीला पूर्ण सुरक्षा देऊ शकत नाही. अशावेळी आपण स्वतः मोबाईल साक्षर’ होणे हाच सगळय़ात जास्ती खात्रीचा उपाय आहे!





























































