
>> सुजाता बाबर
अवकाश संशोधनाच्या कामात रोज नवे शोध समोर येतात. त्यातीलच एक म्हणजे शुक्रावर प्रकाश संश्लेषण शक्य असल्याबाबत संशोधकांनी मांडलेले मत. शुक्रावर प्रकाश संश्लेषण शक्य झाल्यास शुक्राच्या आणि परग्रहावरील जीवसृष्टीच्या शोधाला निश्चितच नवी दिशा मिळू शकते.
पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या अस्तित्वामागे एक प्रक्रिया खूप मोलाची आहे ती म्हणजे प्रकाश संश्लेषण! ही प्रक्रिया नसती तर हिरवीगार झाडे दिसली नसती आणि पर्यायाने इतर प्राणीसृष्टीदेखील! प्रकाश संश्लेषण जीवसृष्टीला अन्न पुरवणारी महत्त्वाची प्रक्रिया आहे. मागील काही वर्षांपासून शुक्र ग्रह खूपच चर्चेत आहे.
शुक्रावरचे प्रचंड उष्ण तापमान आणि सल्फ्युरिक आम्ल यामुळे शुक्र हा जीवनास योग्य ग्रह मानला जात नाही. तरीही त्यावर सापडलेले फॉस्फीन हे सूक्ष्मजीवांना पोषक असू शकते हे लक्षात आले आहे. यामुळे परजीवांच्या शोधार्थ निघालेल्या शास्त्रज्ञांना पुन्हा एकदा शुक्राने आकर्षित करून घेतले. नुकत्याच लागलेल्या एका शोधाने शुक्रावर प्रकाश संश्लेषण शक्य आहे असे वक्तव्य केले आहे. या संशोधनाचे नेतृत्व जैवरसायनतज्ञ राकेश मोगल यांनी केले आहे.
हा अभ्यास सांगतो की, शुक्राच्या वातावरणात फोटोट्रॉपिझम शक्य आहे. फोटोट्रॉपिझम म्हणजे प्रकाशाच्या प्रतिसादार्थ जीवांची वाढ होण्याची प्रक्रिया. हे जीवाणू प्रकाशाचा प्राथमिक ऊर्जा स्रोत म्हणून वापर करतात. या संशोधकांच्या मते शुक्राभोवतीच्या खालच्या आणि मधल्या ढगांच्या थरांमध्ये वर्षभर प्रकाश संश्लेषण होऊ शकते.
एवढेच नाही तर या संशोधनामध्ये असेही वर्तविले आहे की, प्रकाश संश्लेषण रात्रीदेखील होऊ शकते. याचे मुख्य कारण म्हणजे शुक्राच्या पृष्ठभागावरून आणि वातावरणातून औष्णिक किंवा अवरक्त ऊर्जा उगम पावते. सूर्यप्रकाशापासून मिळणारी ऊर्जा ढगांच्या वर आणि खाली दोन्ही ठिकाणी सूक्ष्मजीवांना उपलब्ध होईल. ही ऊर्जेची परिस्थिती सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी आणि ऊर्जा दुसरीकडे वळविण्यासाठी अगदी आदर्श स्थिती आहे. संशोधकांनी शुक्राच्या गरम वातावरणातून आणि पृष्ठभागावरून येणाऱ्या फोटॉन प्रवाहाची पृथ्वीवरील कमी प्रकाश असलेल्या पह्टोट्रॉफिक अधिवासांमध्ये मोजलेल्या पह्टॉन प्रवाहाशी तुलना केली. हे अधिवास पूर्व पॅसिफिकमध्ये दिसून येतात. इथे जलविद्युत उद्रेक आहेत, जेथे भू -औष्णिक उत्सर्जनामुळे 7,874 फूट खोलीपर्यंत फोटोट्रॉफी (सूर्यप्रकाशापासून मिळणाऱया ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर) दिसून येते. त्याचप्रमाणे काळा समुद्र, जिथे 394 फूट खोलीवर सौर शक्तीवर चालणारी पह्टोट्रॉफी अस्तित्वात आहे. शुक्रावरील पह्टॉन प्रवाह पृथ्वीवरील गडद वातावरणापेक्षा जास्त आहेत.
तसेच, ढगांतील सौर आणि औष्णिक विकिरण पृथ्वीवर आढळणाऱया प्रकाश संश्लेषक रंगद्रव्यांद्वारे शोषले जाऊ शकतात. तसेच, ढगांतील सौर आणि औष्णिक विकिरण प्रकाश संश्लेषक रंगद्रव्यांद्वारे शोषले जाऊ शकतात. ही प्रक्रिया पृथ्वीवर आढळते.
अजून एक पूरक गोष्ट म्हणजे शुक्रावरील ढगांच्या मधल्या आणि खालच्या थरांमध्ये अतिनील किरणे खूप कमी आहेत. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या तुलनेत अतिनील किरणांचे प्रमाण 80 ते 90 टक्क्यांनी कमी आहे. या संशोधनातील टेक्निश युनिव्हर्सिटी बर्लिन येथील शास्त्र्ज् येओन जू ली यांनी हा शोध घेण्यासाठी रेडिएटिव्ह ट्रान्सफर मॉडेलचा वापर केला. यामुळे वातावरणाच्या त्याच भागात जवळजवळ विकिरण मुक्त क्षेत्र तयार होते जेथे तापमान आणि दाबदेखील पृथ्वीसारखे असतात.
समशीतोष्ण भागामध्येही शुक्राचे वातावरण खूप कोरडे असते. कोणत्याही सूक्ष्मजीवांच्या अस्तित्वासाठी पाण्याचा अभाव आणि इतके कोरडे वातावरण योग्य असू शकणार नाही. मोगल आणि त्यांचे सहकारी याच्याशी सहमत नाहीत. त्यांना आढळले की शुक्राच्या ढगांमध्ये सल्फ्युरिक आम्लाच्या उदासीन (न्युट्रल) स्वरूपातील अमोनियम बायसल्फेट काही प्रमाणात असू शकते. असे असेल तर शुक्रावरील पाण्याच्या अंशाचा आधीचा अंदाज चुकीचा ठरू शकेल. म्हणजेच शुक्रावरचे वातावरण हे आधीच्या अंदाजापेक्षा कमी आम्लीय असू शकेल.
असे असेल तर शुक्र हा अधिवासयोग्य ग्रह असू शकतो! शुक्रावरील आम्लता आणि पाण्याच्या अभिक्रियांची पातळी ही पृथ्वीवरील सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी जेवढी लागते तेवढय़ाच श्रेणीमध्ये येते. शिवाय मर्यादित अतिनील किरण असूनही शुक्र सातत्याने तळपत असतो. यावरून असे म्हणता येते की शुक्रातील ढगांमध्ये जिवांसाठी पोषक वातावरण आहे. याचा शोध घेण्यासाठी लवकरच मोहिमादेखील आखल्या जातील.
शुक्राचे एक गूढ मात्र अजूनही उकललेले नाही. शुक्राच्या वातावरणात असामान्य गडद रेषेसारखे काही पॅचेस दिसतात. याबद्दल अजून फारसे शोध लागलेले नाहीत. हे पॅचेस अतिनील प्रकाश शोषून घेत असल्याने त्यांना ‘अज्ञात शोषक’ असेही म्हणतात. त्यांच्यामध्ये सल्फर असले तरी त्यांची नेमकी रचना अद्यापही अज्ञात आहे. पूर्वीच्या संशोधनामध्ये असे आढळले आहे की या पॅचमधील कण पृथ्वीवरील जीवाणूंच्या आकाराचे आहेत.
हे पॅचेस ठराविक वेळी येतात, काही दिवस दिसतात. त्यांचे आकार आणि त्यांच्यातील वैधर्म्य वेळोवेळी बदलत असते. अतिनील प्रकाशामध्ये 30 ते 40 टक्के वैधर्म्य असते आणि त्यांच्यामध्ये फेरफार होऊन ते मोठय़ा तरंगलांबीमध्ये रूपांतरित होतात. हे पह्टोट्रॉफ असण्याची शक्यता आहे का हा प्रश्न मनात येणे सहाजिकच आहे. पण हे आत्ताच आपण सांगू शकत नाही. काही शास्त्र्ाज्ञांनी असे सिद्ध केले आहे की, हे पॅचेस सूक्ष्मजंतूंनी बनलेले आहेत, पृथ्वीवरील तलाव आणि महासागरांमध्ये सापडणाऱया शैवालाच्या बहरासारखे आहेत.
हे सगळे लक्षात घेता शुक्रावर प्रकाश संश्लेषण शक्य आहे असे संशोधकांचे मत आहे. असे असेल तर शुक्राच्या आणि परग्रहावरील जीवसृष्टीच्या शोधाला निश्चितच नवी दिशा मिळेल.
(लेखिका खगोल अभ्यासक आहेत.)





























































