
>> स्पायडरमॅन
हवेत लग्न, पाण्यात लग्न, विमानात लग्न असे आधुनिक लग्नाचे विविध प्रकार सध्या प्रचंड लोकप्रिय आहेत. सेलिब्रेटींची ओळख समजले जाणारे ‘डेस्टिनेशन वेडिंग’देखील आता सहजपणे आपल्या आजूबाजूला होताना दिसू लागली आहेत. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत तामीळनाडूमधील एक जोडपे एक विलक्षण वेडिंग रिसेप्शन पार्टीचे आयोजन करत आहे. ही पार्टी सध्या प्रचंड चर्चेत आहे.
तामीळनाडूमधील दिनेश आणि जनकनंदिनी रामासामी हे जोडपे ‘मेटावर्स’ या आभासी जगतात स्वतःची ‘वेडिंग रिसेप्शन पार्टी’ देणार आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने होणारा हा समारंभ अनेकांसाठी उत्कंठेचा विषय ठरला आहे. सहा फेब्रुवारीला संपन्न होणाऱया या समारोहासाठी ‘हॅरी पॉटर’ ही थीम या जोडप्याने निवडली आहे. हॅरी पॉटर चित्रपटात दाखवण्यात आलेल्या विविध लोकेशन्सचा यामध्ये प्रयोग केला जाणार आहे.
‘हॉगवॉर्टस् स्कूल ऑफ विचक्राफ्ट ऍण्ड विझार्ड्री (The Hogwarts School of Witchcraft and Wizardry) च्या पार्श्वभूमीवर हा समारोह सुरू होईल. यामध्ये हॅरी पॉटर चित्रपटातील इतरही अनेक मोठय़ा इमारतींचा समावेश करण्यात येईल. या समारोहाचे 3 डी मोडमध्ये लाइव्ह टेलिकास्ट केले जाणार असून, त्यांचे जगभरातील मित्रमैत्रिणी या समारोहात सहभाग नोंदवणार आहेत.
‘मेटावर्स’ या आभासी ‘डिजिटल’ जगात, वास्तवातले लोक जे ‘डिजिटल’ स्वरूपात वावरू शकतात आणि एकमेकांशी चर्चा करणे, सहभाग नोंदवणे अशी कामेदेखील करू शकतात. मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार जगातले पहिले ‘मेटावर्स वेडिंग’ हे अमेरिकेतील एक शहर फ्लोरिडा येथे पार पडले होते. ट्रेसी आणि डेव्ह गॅगनन (Traci and Dave Gagnon) नावाच्या युगल जोडप्याने सप्टेंबर, 2021 मध्ये एक व्हर्च्युअल लग्न समारोह आयोजित केला होता. ट्रेसी आणि डेव्ह गॅगनन यांच्या या ‘मेटावर्स वेडिंग’च्या साठी डेव्ह आणि ट्रेसी यांचे स्पेशल व्हर्च्युअल अवतार तयार करण्यात आले होते. या लग्नासाठी ‘आकाश’ ही थीम वापरण्यात आली होती. हे लग्न जणू आकाशात, ढगांमध्ये सुरू आहे असाच आभास बघणाऱया प्रत्येकाला होत होता.





























































