
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी शिवसनेच्या खासदारांची बैठक झाली. त्यानंतर संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आता जे काही सुरू आहे, ते म्हणजे कॉमेडी एक्सप्रेस सिजन 2 आहे. कॉमेडी एक्सप्रेस सिजन 1 मुंबईत विधीमंडळात झाला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात 20 तारखेला सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीशांच्या घटना पीठासमोर फुटीर आमदारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.
16 आमदारांच्या अपात्रतेबाबत शिवसेनेने दाखल केलेली याचिका कायद्याच्या आणि नियमांच्या चौकटीत पक्की आहे. त्यात आम्हाला न्यायालयात न्याय मिळेल, या भीतीतून आज फुटीर गटाने घाईघाईने त्या एका गटाने निर्णय घेतला. तो एक गट शिवसेनेची कार्यकरिणी कशी बरखास्त करु शकतो, असा सवालही त्यांनी केला. त्या फुटीर गटाला अजून पक्ष म्हणून मान्यता नाही. तो फुटीर गट हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 56 वर्षांच्या शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करतो आणि स्वतःची कार्यकरिणी जाहीर करतो. हे कॉमेडी एक्सप्रेस सिजन 2 आहे. यावर जनता हसत आहे, याची मजा घेतली जात आहे.
स्वतःची कातडी वाचवण्यासाठी, स्वतःचे आमदार वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. जे सोडून गेले आहेत, त्यांच्याशिवाय शिवसेना भक्कमपणे उभी आहे आणि अधिक भक्कम होणार आहे. आमचे नेतेमंडळ हे बाळासाहेब ठाकरे आणि कार्यकरिणीने निर्माण केले आहे. शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी हे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या माध्यमातून निवडले गेले आहेत. शिवसेना हा नोंदणीकृत राष्ट्रीय पक्ष आहे. आमची मूळ शिवसेना आहे. कोणत्याही एका गटाला शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा अधिकार नाही. जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहे. त्याचा शिवसेनेवर काहीही परिणाम होणार नाही.
त्या गटाच्या कोणत्याही दाव्याला उत्तर द्यायला आम्ही आलेलो नाही. आम्ही आमची शिवसेनेची भूमिका मांडत आहेत. संभ्रम आणि राजकीय गोंधळ निर्माण करणे, आपला गट आणि गटातील लोकांना वाचवण्यासाठी त्यांची अखेरची धडपड आहे. मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रीपदी घेतलेली शपथच बेकायदेशीर आहे. अपात्रतेची जी 16 नावे दिली आहेत. त्यात पहिले नाव त्यांचे आहे. त्यांची खुर्ची वाचवण्यासाठी ते दिल्लीत येतील. मात्र, या देशातील न्याय अद्याप मेलेला नाही, याची आपल्याला आणि शिवसेनेला खात्री आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात न्याय होईल.
बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राजकीय पक्ष नोंदणीकृत असे असताना फुटून गेलेला गट त्यांची शिवसेना असे म्हणतो, ते कशाच्या आधारावर म्हणतात. बाळासहेब ठाकरे यांची शिवसेना इथे आहे. शिवसेना ही शिवसेनाभवनातूनच चालेल. तुमचा वेगळा गट असेल. तुमचा वेगळा संसार थाटा, आमचे काही म्हणणे नाही. लोकसभेत शिवसेना एकसंध असून फुटीर गटाकडे जाणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे संजय राऊत यांनी ठणकावले आहे. एक फुटीर गट नोंदणीकृत पक्षाची कार्यकरिणी रद्द करून स्वतःची कार्यकारिणी कशी निर्माण करू शकतो, असा सवालही त्यांनी केला. हा कॉमेडी एक्सप्रेस सिजन 2 सुरू आहे. जनता त्याची मजा घेत आहे.




























































