
खासगी कुरियर कंपनीचे पार्सल घेऊन एसटीने प्रवास करणाऱ्या तरुणावर मुलींची छेड काढतोस, असा आरोप करून त्याच्याकडील 24 लाखांची रोकड चोरणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या घातल्या आहेत. ही घटना 6 ऑक्टोबरला यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती.
ओंकार दिनकर जाधव (24,रा.अकोळनेर, नगर), अनिकेत गोरख उकांडे (23,रा.अकोळनेर, नगर), किरण रामदास गदादे (23, रा.तांदळी, ता.शिरुर), तेजस मोहन दुर्गे (20, रा.बारामती) आणि गणेश बाळासो कोळेकर (20, रा.सांगवी, ता.बारामती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
तक्रारदार खासगी कंपनीचे कुरिअर घेऊन 6 ऑक्टोबरला एसटीने प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्यावर काही चोरट्यांनी पाळत ठेवत सहप्रवासी म्हणून प्रवासाला सुरुवात केली. एसटी यवत परिसरात येताच चोरट्यांनी कुरिअर बॉयला तू मुलींना का छेडतो, असे ओरडून त्याला मारहाण केली. त्याच्या ताब्यातील कुरिअर बॅग घेऊन 24 लाखांची रोकड चोरून नेली. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तैनात केले होते.
पथकाने 15 दिवसांत आरोपींचा माग काढून टोळीला जेरबंद केले आहे. आरोपींचा एक साथीदार पसार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपींना यवत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी ननवरे, सचिन घाडगे, विजय कांचन, अजित भुजबळ, अजय घुले, राजू मोमीन, दत्तात्रय तांबे, बाळासाहेब खडके, धिरज जाधव, दगडू विरकर यांनी केली.
























































