
अंधेरीतील वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या गोखले पुलामुळे अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी, साकीनाका परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे गोखले पुलाची एक मार्गिका सुरू करण्यात यावी , अशी मागणी शिवसेनेने महापालिकेसह संबंधित यंत्रणांकडे केली आहे.
अंधेरीतील गोखले पूल धोकादायक झाल्यामुळे 7 नोव्हेंबरपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पालिकेच्या अखत्यारीतील पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी रेल्वेच्या अखत्यारीतील पुलाचे काम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्यांसह प्रवासी, वाहनचालक तसेच अंधेरी आणि विलेपार्ले पश्चिमेस जाणाऱया विद्यार्थ्यांनाही याचा त्रास होत आहे.
या पार्श्वभूमीवर, शिवसेना आमदार ऋतुजा लटके यांनी महापालिका, वाहतूक, पोलीस, रेल्वे प्रशासनातील अधिकार्यांबरोबर आज पुलाची पाहणी केली. पुलावरील एक मार्गिका सुरू करून सायकल, दुचाकी, रिक्षा, शाळेच्या बसेससाठी परवानगी देऊन दिलासा द्यावा, अशी सूचना लटके यांनी केली. यावेळी उपविभाग प्रमुख अनिल खांडेकर, माजी नगरसेवक संदीप नाईक, अमेय लटके आदी उपस्थित होते.



























































