
उजनी धरणाच्या भीमा-सीना जोड कालव्यातून सीनानदीवरील 17 बंधारे भरण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. सुरुवातीला शंभर क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार असून, टप्प्याटप्प्याने यामध्ये वाढ होणार आहे. आगामी तीन दिवसांत 950 क्युसेक्सपर्यंत पाणी सोडले जाईल, अशी माहिती उजनी धरण नियंत्रण विभागाकडून देण्यात आली आहे.
मागील पावसाळ्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने उजनी धरणातील पाण्याची अद्यापपर्यंत शेतीसाठी आवश्यकता भासलेली नाही; परंतु सीना नदी व त्यावरील 17 बंधाऱयांतील पाणी कमी होऊ लागले आहे. रब्बी हंगामासाठी शेतकऱयांनी मोठय़ा प्रमाणावर पाणी उचलून घेतले आहे. त्यामुळे सीना नदीत व त्यावर असलेल्या 17 बंधाऱयांमध्ये पाणी कमी पडू नये, यासाठी गुरुवारी सकाळी नऊ वाजेपासून बोगद्यातून सीना नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.
उजनी धरण मागील पावसाळ्यात 111 टक्के भरले होते व त्यामध्ये 123 टीएमसी पाणीसाठा झालेला होता. सध्या धरणात 108 टक्के पाणी असून, 121.21 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. या मुबलक पाणीसाठय़ातून कालवा, बोगदा व सिंचन योजनेतून शेतीसाठी पाणीपुरवठा होणार आहे. 6 ते 10 जानेवारी 2023 दरम्यान सीना- माढा सिंचन योजना व दहीगाव उपसा सिंचन योजनेतून शेतीसाठी पाणी सोडण्यात येणार असल्याचेही माने यांनी यावेळी सांगितले.




























































