विमानतळावर आलेल्या प्रवाशाची बॅग लांबवली, सुरक्षा कंपनीच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका प्रवाशाची बॅग अचानक गहाळ झाली होती. त्या बॅगेत दहा हजार 850 रुपये हिंदुस्थानी चलन व एक हजार अमेरिकन डॉलर होते. अखेर एका सुरक्षा कंपनीच्या तिघा कर्मचाऱ्यांनी ही बॅग तेथून घेऊन गेल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्याविरोधात सहार पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कांतीलाल हिराणी हे प्रवाशी दोहाहून कतार एअरवेजने सोमवारी संध्याकाळी मुंबईत विमानतळावर आले. विमानतळावर पोहचल्यानंतर हिराणी लेव्हल 1 सिटीसाईड परिसरात आले. तेथे त्यांनी त्यांचे सर्व सामान ट्रॉलीवर ठेवले. काही वेळेनंतर हिराणी त्यांची एक ट्रॉली बॅग घेऊन गेले. तेव्हा ते त्यांची छोटी बॅग घेऊन जायला विसरले. त्या बॅगेत दहा हजार 850 रुपयांचे हिंदुस्थानी चलन तसेच एक हजार अमेरिकन डॉलर, आधार कार्ड आदी साहित्य होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी एका पोलिसासह टी-1 येथील नियंत्रण कक्षात जाऊन सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता तेथील एका सुरक्षा कंपनीच्या कंत्राटावर असलेले तिघे कर्मचारी त्या ठिकाणाहून हिराणी यांची ती बॅग असलेली ट्रॉली घेऊन जाताना दिसून आले.

त्यानंतर सहार पोलिसांनी याबाबत त्या कर्मचाऱ्यांकडे बॅगेबाबत विचारणा केली. मात्र त्यांनी बॅगेबद्दल माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे मोहम्मद रईस कुरेशी आणि हरेश पाटील या दोघा कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलीस ठाण्यात केलेल्या चौकशीत रईस आणि हरेश यांनी गुन्हा केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी रईस आणि हरेशला अटक केली. त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.