
जेईई मेन 2023 परीक्षेचे जानेवारी सत्र 1 फेब्रुवारीला पार पडले. 24 जानेवारीपासून जेईई मेनच्या पहिल्या सत्रातील परीक्षा सुरू झाल्या होत्या. आता या परीक्षेचे निकालही लवकरच जाहीर करणार असल्याचे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) जाहीर केले आहे. 7 फेब्रुवारीपर्यंत या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.
एनटीएचे संचालक विनीत जोशी यांनी जेईई मेनच्या पहिल्या सत्राच्या निकालाविषयी माहिती दिली. परीक्षेसोबत निकालाची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे निकाल जाहीर होण्यास उशीर होणार नाही. गेल्यावर्षी कोरोनामुळे निकाल जाहीर करण्यास उशीर झाला. मात्र यंदा एनआयटी आणि आयआयटीचे प्रवेश वेळेवर होणार आहेत.
यंदा जेईई मेन जानेवारी आणि एप्रिल अशा दोन टप्प्यांत होत आहे. यंदा पहिल्या सत्रासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी पाच ते सहा टक्के विद्यार्थी कमी दिसून आले. मात्र तरीही गेल्यावर्षींच्या तुलनेत विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. पहिल्या टप्प्यासाठी 8 लाख 66 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी सुमारे 50 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग घेतला नाही.
10 फेब्रुवारीपासून जेईई मेनचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. पहिल्या सत्राचा निकाल लागताच दुसऱया सत्राची नोंदणी सुरू होणार आहे. दुसऱया सत्राची परीक्षा 6 एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्याचा निकाल 20 एप्रिलला जाहीर होणार आहे. दोन्ही सत्रांसह एकूण अडीच लाख विद्यार्थ्यांची जेईई ऍडव्हान्ससाठी निवड होणार आहे.

























































