
रिक्षाचे भाडे का नाकारले याचा जाब विचारल्याने संतप्त रिक्षाचालकाने पोलीस शिपायाला बेदम मारहाण केल्याची घटना वाकोला परिसरात घडली. प्रदीप जगदाळे असे जखमी पोलिसाचे नाव आहे. मारहाण करणाऱ्या आरिफ शेख आणि सद्दाम शेखला पोलिसांनी अटक केली. आरिफ आणि सद्दामविरोधात 2015 मध्ये घाटकोपर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल आहे.
जगदाळे हे वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. सोमवारी ते नेहमीप्रमाणे डय़ुटीवर आले. ते कारवाईसाठी वाकोल्याच्या डवरीनगर येथे गेले होते. कारवाई करून जगदाळे पुन्हा पोलीस ठाण्यात येत असताना एक रिक्षाचालक हा भाडे नाकारत होता. तेव्हा जगदाळे याने आरिफला जाब विचारला असता आरिफने जगदाळे याच्याशी वाद घातला.
























































