
>> हर्षवर्धन दातार
पूर्वीच्या काळी सायकलला एक ग्लॅमर होतं आणि तिच्या समावेशाने चित्रपटाला एक वेगळी मजा यायची. काही गाण्यांत ‘टॅनडेम’ सायकलीही आहेत, म्हणजे एकामागे एक अशा दोन सीट असलेल्या सायकली. चला तर काही युगुल जोडय़ांबरोबर सायकलीवरून एक फेरफटका मारू या.
‘चित्रपटातील सायकलीवरच्या गाण्यांत नायक आणि नायिकांबरोबर सहकारीसुद्धा होते. आज आपण काही अशा सायकलीवरच्या गाण्यांची चर्चा करणार आहोत, जी फक्त नायक आणि नायिकेवर चित्रित केली गेली आहेत. अर्थात सायकल एक, पण प्रवासी दोन. म्हणजेच एक रोमँटिक जोडी. पूर्वीच्या काळी सायकलला एक ग्लॅमर होतं आणि तिच्या समावेशाने चित्रपटाला एक वेगळी मजा यायची. काही गाण्यांत ‘टॅनडेम’ सायकलीही आहेत, म्हणजे एकामागे एक अशा दोन सीट असलेल्या सायकली. चला तर काही युगुल जोडय़ांबरोबर सायकलीवरून एक फेरफटका मारू या. या भागात प्रथमदर्शनी डोळय़ांसमोर येत ते ‘तेरे मेरे सपने’ (1971) या आनंद बंधूंच्या (देव आणि विजय) चित्रपटातील ‘हे मैने कसम ली’ हे नीरज लिखित, सचिन देव बर्मन संगीत दिग्दर्शित आणि किशोर कुमार व लताजींनी गायलेले अतिशय मधुर लोकप्रिय गाणे.
गावाबाहेरील रंगीबेरंगी फुलांच्या उद्यानांमधून सायकलवर रोमँटिक मूडसहित निघाले आहेत देव आनंद आणि मुमताज. ‘बेवकूफ’मध्ये (1960) मजरूह-सचिन देव बर्मन जोडीचं, आशा भोसले आणि किशोर कुमार यांचं ‘मायकल है तो सायकल’ एक मजेदार युगुल गीत आहे.
टॅनडेम सायकलवर किशोर कुमार आणि माला सिन्हा फेरफटका मारताना दिसत आहेत. या चित्रपटातील काही गाण्यांत पडद्यावरील किशोर कुमारला आवाज दिला आहे मन्ना डेंनी. ‘अपना घर’मध्ये (1960) सायकलवर जात असलेले नंदा आणि मोती सागर गात आहेत रफी आणि सुमन कल्याणपूरच्या आवाजात ‘कैसे भीगे भीगे’ हे रोमँटिक गाणे. सोबत आहे निसर्गरम्य परिसर. प्रेम धवनच्या शब्दांना संगीत रवीचे. ‘जॉनी वॉकर’ (1957) नावाच्या या चित्रपटामध्ये खुद्द जॉनी वॉकर आणि श्याम या प्रसिद्ध जोडीवर टॅनडेम सायकलवर चित्रित ‘बच के बलम’ हे रफी आणि गीता दत्तने गायलेले गमतीदार गाणे आहे. हसरत जयपुरींच्या शब्दाला ओ. पी. नय्यर यांचे ठेकेदार संगीत.
जॉनी वॉकर आणि श्याम मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर फिरताना ऐतिहासिक कल्पनाविश्वात रमतात आणि सायकलीवर बसून मुंबई, कोलकाताची सफर करून येतात. चित्रीकरणही खूपच गोड आहे. ‘हम सब चोर है’मधील (1956) ‘हमको हसते देख जमाना जलता है’ हे कदाचित सर्वात लहान आणि अगदी थोडा वेळ सायकल दृश्य असलेले गाणे. आय. एस. जोहर आणि मजनू या दोन विनोदी कलाकारांवर चित्रित, मजरूह लिखित आणि कमी चर्चित जी. एम. दुर्रानी यांचे संगीत. चोर आणि पोलीस दोघेही टॅनडेम सायकलवर अगदी थोडा वेळ दिसतात. चोरांचा पाठलाग करणारे पोलीस. एकूण हे गाणे बघताना हसून हसून पुरेवाट होते. या भागातील अतिशय मधुर आणि श्रवणीय गाणे म्हणजे ‘एक ही रास्ता’मधलं (1956) ‘सांवले सलोने आये दिन बहार के’ मजरूह सुल्तानपुरीचे शब्द, हेमंत कुमारचे संगीत आणि आवाजही. जोडीला लताजी आहेतच. सुनील दत्त आणि मीनाकुमारी टॅनडेम सायकलवर चालले आहेत व सोबतीला गोड डेझी इराणी. यात हलकाफुलका रोमान्स आहेच, पण त्याच्या जोडीला निसर्गाचे नयनरम्य वर्णनही आहे. गाण्यामध्ये माऊथ ऑर्गनचे सुरेल तुकडेही आहेत. ‘आरोप’मध्ये (1974) ‘नैनो में दर्पण है, दर्पण में कोई’ या कवयित्री आणि गीतकार माया गोविंदच्या शब्दांना अतिशय मधुर श्रवणीय असे संगीत दिले आहे भारतरत्न विजेते आसामचे भूपेन हजारिकांनी. उत्कृष्ट युगल गायन अर्थात किशोर-लताचे. वाद्यमेळ आणि चालीत हलकेसे पंचमदा डोकावतात. दोन्ही बाजूला हिरवळ आणि मधल्या छोटय़ा रस्त्यावर हँडसम विनोद खन्ना आणि मोहक सायराबानो प्रेमाची कोडी सोडवीत सायकलवरून भ्रमण करतानाचे दृश्य डोळय़ांना (आणि कानांनाही) सुखावून जाते.
‘गौतम गोविंदा’मध्ये (1979) एक वेगळी जोडगोळी आपल्याला ‘एक ऋतू आये, एक ऋतू जाये’ या गाण्यात सायकलवर दिसते. ‘पोस्टमन गोपाळ’ (‘रामायण’फेम विजय अरोरा) हा पोलीस इन्स्पेक्टर गौतमला (शशी कपूर) आपल्या सायकलवर गावात घेऊन येतो.
येताना आपल्याला गाण्यातून आणि चित्रीकरणातून दुष्काळग्रस्त कोरडी जमीन, गरिबीला आणि जुलमाला गांजलेले खंगलेले गरीब लोक असं उद्विग्न करणारं दृश्य दिसतं. गाण्याचे शब्द दार्शनिक आहेत. सालाबादप्रमाणे ऋतू बदलतात, पण लोकांचं नशीब काही बदलत नाही. या आयुष्याबद्दलच्या तत्त्वज्ञानाला शब्द दिले आहेत आनंद बक्षींनी आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीताला नेहमीपेक्षा वेगळा संथ आवाज दिला आहे किशोर कुमार यांनी. जगप्रसिद्ध टय़ुलिप फुलांच्या बगिचात चित्रित झालेले आणि तसेच सुसंगत शब्द असलेले ‘प्रेमरोग’ (1982) चित्रपटातील ‘भँवरेने खिलाया फूल’. पंडित नरेंद्र शर्मा यांच्या शब्दांना संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे आणि आवाज सुरेश वाडकर व लताजींचा. पडद्यावर थोडय़ा वेळाकरिता सायकलवर आहेत थोडा वयस्क दिसणारा ऋषी कपूर आणि नाजूक, सुंदर पद्मिनी कोल्हापुरे. दूरवर पसरलेले रंगीबेरंगी फुलांचे ताटवे आणि मधुर संगीत आपले मन मोहून घेतात. राकेश रोशनच्या फिल्पाफ्ट बॅनरखाली तयार झालेला चित्रपट ‘किंग अंकल’ (1993). पुन्हा एकदा रंगीबेरंगी फुलांच्या सान्निध्यात आपल्याला दिसतात कोवळा निरागस स्मित असणारा शाहरुख खान आणि नगमा. इंदिवर यांच्या ‘इस जहाँ की नही है तुम्हारी आँखे’ गीताला संगीत बंधू राजेश रोशन यांचे आणि पार्श्वगायन नितीन मुकेश व लताजी. ‘दामाद’ (1978) हा रजत रक्षीत दिग्दर्शित चित्रपट. गीतकार योगेशनी लिहिलेले आणि हेमंत भोसलेंनी संगीत दिलेले ‘जिंदगी के सफर में न जाने’ हे सायकलवर फिरायला निघालेल्या शरद (अमोल पालेकर) आणि रेणू (रंजिता ) यांच्यावर चित्रित उडत्या वाहत्या चालीचे गाणे. वाद्यमेळ आणि चालीमध्ये इथेही आपल्याला काही प्रमाणात पंचमदा दिसतात. आपल्या मुलाच्या (हेमंत भोसले) संगीताला स्वर दिला आहे आशा भोसले आणि रफीसाहेबांनी.
– [email protected]
(लेखक संगीत अभ्यासक आहेत)























































