पर्यावरण अभ्यासक अभिनेता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गणेश आचवल

सध्या ‘झी मराठी’वरील ‘लोकमान्य’ मालिकेने अनेकांच्या मनात घर केलं आहे आणि या मालिकेतून अनेक चेहरे आपल्यासमोर येत आहेत. या मालिकेत विष्णुशास्त्री चिपळूणकर ही व्यक्तिरेखा साकारणारा स्वप्नील फडके… एक प्रॉमिसिंग चेहरा.

 स्वप्नीलला नाटय़कलेची आवड लहानपणापासून होती. दहावीत असताना त्याचा मामा सुनील जोशी यांनी दिलेल्या संधीतून  ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकासाठी त्याने म्युझिक ऑपरेटिंग, रंगभूषा, वेशभूषा अशा सर्व गोष्टीत सहाय्य केले होते. त्याची भेट जेव्हा चेतन दातार याच्यासोबत झाली आणि मग ‘आविष्कार’ नाटय़ संस्थेत प्रवेश घेऊन त्याच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर त्याच्या आयुष्यात एक वेगळं वळण आलं. चेतन दातार यांची कार्यशाळा त्याने केली आणि ती कार्यशाळा त्याला खूप चांगला अनुभव देणारी ठरली .

रुपारेल कॉलेजमध्ये कला शाखेत त्याने प्रवेश घेतला आणि कॉलेजमध्ये असताना  अद्वैत दादरकर, इरावती कर्णिक यांच्या लेखन, दिग्दर्शनाखाली  आयएनटी, युथ फेस्टिव्हल, सवाई या एकांकिका स्पर्धांतून स्वप्नील  अभिनय करू लागला. ‘बाळकडू’, ‘तीच ती दिवाळी’, ‘मृगाचा पाऊस’ या एकांकिका यशस्वी झाल्या. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटात त्याने भूमिका केली. ‘बाळकडू’ या एकांकिकेचे पुढे दोन अंकी नाटक झाले आणि त्यात त्याने मुख्य भूमिका केली. त्यानंतर ‘भैरोबा’, ‘स्वप्नांच्या पलीकडले’, ‘तुझं माझं ब्रेकअप’, ‘जिंदगी नॉट आऊट’ अशा अनेक मालिकांत त्याने काम केले. ‘श्रीमंत दामोदरपंत’, ‘वासूची सासू’, ‘फक्त तुझी साथ हवी’ या व्यावसायिक नाटकांतदेखील त्याने भूमिका केल्या.

मारुती चित्तमपल्ली यांच्या कथांवर आधारित काही कार्यक्रम करावेत असे ठरवून त्या दिशेने त्याची वाटचाल सुरू झाली. मग त्यासाठी प्रत्यक्ष जंगलात जाऊन शूटिंग करणं, शाळेतल्या मुलांना जंगल सफर घडवून मार्गदर्शन करणं असे विविध उपक्रम त्याने सुरू केले. लॉकडाऊनमध्ये निराश न होता स्वतःचे यूटय़ूब चॅनल सुरू करून स्वप्नीलने कथाकथन सुरू केले. प्रसिद्ध हत्ती अभ्यासक आनंद शिंदे यांच्या संस्थेसाठी गेली काही वर्षे तो काम करत आहे. ‘बावरा दिल’ ही मालिका ‘जीव झाला येडापिसा’चा रिमेक होता. त्यात त्याने ‘जलवा’ ही भूमिका साकारली. ‘लोकमान्य’मधील त्याच्या भूमिकेविषयी तो म्हणाला, जेव्हा मला विष्णुशास्त्राr चिपळूणकर ही भूमिका मिळाली, तेव्हा त्या भूमिकेच्या दृष्टीने अभ्यास करणे अतिशय महत्त्वाचे होते. निबंधमालेचे वाचन मी केले, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात जाऊन विष्णुशास्त्राr चिपळूणकर यांच्या संदर्भात जी पुस्तके उपलब्ध आहेत, त्यांचं वाचन केलं. चिपळूणकर म्हणजे शब्द, भाषा, व्याकरण यांचा आदर्श आहेत. त्यांची भूमिका साकारण्याच्या दृष्टीने घेतलेली मेहनत आज फळाला आली आहे. स्वप्नील सध्या काही वेब सीरिजमध्येदेखील काम करत आहे.