
चर्चगेट-गोरेगाव लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यातून विना तिकीट प्रवास करणाऱया एका तरुणीने महिला टीसीला मारहाण केल्याची घटना आज सायंकाळी घडली आहे. सदर महिला टीसीने तरुणीकडे तिकीट नसल्याने तिला दंड भरण्यास सांगितले. तेव्हा तिने टीसीची कॉलर पकडत मारहाण केली. त्यामुळे प्रवाशांनी आपत्कालीन साखळी ओढत गाडी थांबवली. या घटनेमुळे महिला टीसींच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाटय़ावर आला आहे.
चर्चगेटहून गोरेगावच्या दिशेने जाणारी लोकल ट्रेन दादर स्थानकातून पुढे निघाल्यानंतर दोन महिला टीसींनी फर्स्ट क्लासच्या डब्यात तिकीट तपासण्याचे काम सुरू केले. यावेळी एका तरुणीकडे तिकीट नसल्याने सदर महिला टीसीने तिला दंडाची रक्कम भरण्यास सांगितले. यावेळी सदर तरुणीने टीसीशी वाद घालत तिच्या कानफटात लगावली, हातावर चावा घेतला. त्यामुळे इतर सहप्रवाशांनी प्रसंगावधान राखत आपत्कालीन साखळी खेचल्याने गाडी माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान काही काळ खोळंबली होती. त्यानंतर गाडी वांद्रे स्थानकात पोहोचल्यानंतर संबंधित टीसींनी त्या तरुणीला गाडीतून उतरवले. तेव्हाही तरुणी वाद घालत होती. अखेर महिला पोलिसांच्या मदतीने तरुणीला लोहमार्ग पोलीस ठाण्यात नेले. रात्र उशिरापर्यंत तरुणीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.



























































