
>>डॉ. अनिल कुलकर्णी
प्रिय पत्र…
पत्रास कारण की, भावनांचं आदान-प्रदान करणारं पत्र, आज अचानक गायब झालं आहे. वैभव पाहिलेलं पत्र, आज अस्तंगत झाल्याचं पाहून फार वाईट वाटतंय. किती जणांचं आयुष्य पत्रांनी घडवलं, किती जणांना व्यक्त व्हायला व्यासपीठ मिळालं. माणसाच्या मनातले तरंग एरवी विरून गेले असते, पण पत्रामुळे त्या भावना मनामनात पोहोचल्या. पत्राने व्यक्तिमत्त्व समृद्ध झाली.त्यांना वळण लागले. शिस्त लागली. पत्रातून माणसं घडली. पत्रातून इतिहास घडला. पत्राला समृद्ध वारसा आहे. पत्र म्हणजे आयुष्याची सुंदर ठेव, अत्तराच्या कुपीसारखी जपून ठेवावीशी वाटणारी.
पत्र म्हणजे पारिजातकाचा सडा. दुसऱयाच्या अंगणात पडून, त्यांना सुखावणारा तो एक मित्र आहे. पत्रलेखनाची आज स्पर्धा ठेवावी लागते, किती दुर्दैवी. ज्या पत्रांनी प्रेम व्यक्त व्हायचं, ज्या पत्रांनी मानवी मनं ताळ्यावर यायची, ज्या पत्रानी भांडणं सोडविली जायची, ज्या पत्रांनी आयुष्यात दीपस्तंभ दाखवला, ती पत्रं कुठे गेली? पंडित नेहरूंनी तुरुंगात राहून, पत्र पाठवून मुलीचे भावनिक पोषण योग्य वयात केल्यामुळे, एक समृद्ध व्यक्तिमत्त्व उदयास आले.
संवादाचं उत्कृष्ट माध्यम म्हणून पत्राकडे पाहिलं जातं. काही ठिकाणी मित्रच हवे असतात, काही ठिकाणी पत्रंच हवी असतात. मित्राची जागा कोणी घेऊ शकत नाही, तसं पत्राचीही जागा कोणी घेऊ शकणार नाही.
आज भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठच्या नादात भावनेला केव्हाच तिलांजली दिली गेली आहे. पत्र म्हणजे भावनांना टिपणारा टिपकागद होता. व्यक्त व्हायला माध्यमांची कमतरता नाही, तरीही पत्र हवीच. पत्रलेखनाचे कष्ट आज राहिलेच नाहीत. सुबक अक्षर, वळणदार अक्षर, नीटनेटकं अक्षर, मोत्यासारखं अक्षर आज राहिलंच नाही.मोबाईलवर बोटं चालवली की मिनिटांत पत्र तयार होतात आणि मिनिटात जातातसुद्धा. पत्र पोहोचवणारी कबुतरं आज राहिली नाहीत. पोस्टमन दुर्मीळ झाले आहेत. मुलांना पोस्टमन ही संकल्पनाच माहित नाही. कधीतरी पत्र घेऊन पोस्टमन येतो. आता सगळा व्यवहार ईमेलने होतो. पत्र नसताना जी घालमेल होते ही मानवी मनाला त्रासदायक ठरते. पत्र आहे म्हणून जीवनात सुसूत्रता आहे. समोरासमोर माणसं एकमेकांशी बोलू शकत नाहीत, पण पत्रांनी ती जास्त चांगल्या प्रकारे व्यक्त होतात.
पत्रांनी इतिहास घडवला आहे. मानवी मनाला पत्रांमुळे जगण्याची उमेद मिळाली. प्रेमाच्या शिखराकडे जाण्यासाठी पत्र ही पहिली पायरी आहे. पत्रातून जीवनाचे अर्थ शोधायचे असतात. सौंदर्य शोधायचं असतं. शब्दांच्या पलीकडे असलेल्या भावना कळायला हव्यात म्हणून पत्र हवीच. पत्राला मानवानेच निर्माण केलं आणि तोच पत्राला गतवैभव मिळवून देऊ शकतो. मानवी जीवनात पुन्हा आनंद निर्माण करण्यासाठी पत्र हवीत. फक्त रुक्ष व्यवहारासाठी पत्र आज शिल्लक आहेत.
परीक्षेतही आता पत्रलेखन विचारलं जात नाही. पत्रलेखन करायला मुळातच नाती शिल्लक नाहीत. कुणाला पत्र लिहायचं? पत्र ही दिवाळी अंकात वाचायची गोष्ट ठरली आहे. माणसांना पत्र लिहायला उद्युक्त होईल अशी परिस्थिती निर्माण व्हायला हवी. हसवण्यासाठी, रडवण्यासाठी, मनाला फुंकर घालण्यासाठी पत्र आवश्यक आहेत.
अब्राहम लिंकनने पत्र लिहिले, त्याच्यानंतर फार काळ कुणी कुणाला विशेष पत्र लिहिली नाहीत. मानवी भावना जिवंत करण्यासाठी पत्रातून घडावं सारं, पत्रांच्या ही पलीकडलं.
पत्राने परत यावं. अनेक जण पत्राची वाट पाहात आहेत. अनेक कॉमेंट्स पत्राची वाट पाहात आहेत. पत्र आल्यास लोक वेडावून जातील. कधी नव्हे ते प्रेम व्यक्त करतील पत्रावर.
माणसं जेव्हा पत्र लिहितात, तेव्हा ती स्वतची राहत नाहीत. इमोजीच्या जमान्यात आज पत्र लिहिणं म्हणजे भावनेचा उत्तुंग आविष्कार, तसंच पत्र ही आज मन मोकळं करण्याची जागा आहे. पत्राने अनेकांना लिहितं-वाचतं केलं. चर्चा करायला शिकवलं. याचं श्रेय पत्रा तुलाच आहे. जाणिवेतून नेणिवेत शिस्तबध्द प्रवास तूच घडविला.
वर्ष संपलं, स्वप्नं संपली, आशा संपल्या. नवीन वर्ष, नवी उमेद, नवी स्वप्नं, नव्या आशा, फिनिक्स पक्षी जसा राखेतून उभा राहतो तसं मागील वर्षाच्या सुखदुःखाचा जास्त विचार न करता पुढील वर्षी आपण कसे अधिक सक्षम होऊ याचा विचार व्हायला हवा.
खूप काही करायचं आहे, खूप काही जगायचं आहे. प्रत्येकास ध्येय असलं पाहिजे. मागील वर्षांनी प्रतिसाद दिला नाही. नवीन वर्षाला साद घालून प्रयत्न करणं अजून आपल्या हातात आहे. मागील वर्षातील सुखाची घडी, जीवनात ही घडी अशीच राहू दे म्हटलं तरी ती राहात नाही. आज माणसं एकमेकांकडे जात नाहीत, तिळगुळ खाऊनही गोड बोलत नाहीत.
पत्रच माणसांना जवळ आणू शकतात. पत्राने माणसांना विरंगुळा मिळाला, सुख मिळालं… त्याबद्दल पत्रा तुझं अभिनंदन! पंख होते तो उड आती रे… अशीच जाणीव करून दे.
– एक पत्रप्रेमी
[email protected]





























































