अभियोग्यता चाचण्या अन् करीअर निवड, विद्यार्थ्यांचा कल जाणून घ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अविनाश कुलकर्णी

करीअरची निवड करताना ज्या क्षेत्रातून मिळणारा आर्थिक लाभ हा जास्त असतो, त्या क्षेत्राकडे आपल्या पाल्याने जावे असे प्रत्येक पालकाला वाटते. त्यामुळे नीट व जेईई परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी जिवाचा आटापिटा करताना पालक आणि विद्यार्थी दिसतात. लाखोंची उधळणही होते. प्रवेशही कसाबसा मिळतो. एकदा प्रवेश मिळाला की, जीवन यशस्वी झाले असा गैरसमज बहुतांश पालकांमध्ये दिसतो.

इंजिनीअरिंग किंवा मेडिकल कोर्स पहिल्या वर्षातच सोडून देणारी अनेक उदाहरणे आजूबाजूला आढळतात. काही विद्यार्थी कसाबसा कोर्स पूर्ण करतातही, पण त्या क्षेत्रात यशस्वी होत नाहीत. याचे प्रमुख कारण म्हणजे बहुतांश लोक केवळ आर्थिक निकष लक्षात घेऊन करीअरची निवड करताना दिसतात. अभियोग्यता चाचण्या, कौशल्य चाचण्या, व्यक्तिमत्त्व चाचण्या तसेच बुद्धिमत्ता चाचण्यांचा परिणाम लक्षात घेऊन करीअर निवड केली तर प्रयत्न योग्य दिशेने करता येतात.

चाचण्यांचे प्रकार – कौशल्य चाचण्या (स्किल टेस्ट) विद्यार्थ्यांचे त्यांच्या आवडीच्या विषय क्षेत्रातील प्रावीण्य मोजतात. यात दोन क्षेत्रांची तुलनादेखील करता येते. नुकतेच दहावी-बारावी झालेल्या विद्यार्थ्यांकडे जास्त कौशल्ये नसली तरी रुजलेली बीजे मात्र समुपदेशकांच्या लक्षात येतात. अभियोग्यता चाचण्या (ऑप्टिटय़ूड टेस्ट) विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या क्षमतेचा अंदाज घेतात. स्वारस्य चाचण्यांद्वारे (इंटरेस्ट टेस्ट) विद्यार्थ्याचा खरा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे याचा स्पष्ट अंदाज येतो. व्यक्तिमत्त्व चाचण्यांद्वारे (बिहेवियर अँड पर्सनॅलिटी टेस्ट) विद्यार्थ्याची स्वभाव वैशिष्टय़े आणि वर्तणूक समजते. बुद्धय़ांक तपासण्यासाठी बुद्धिमत्ता चाचण्या (इंटेलिजन्स टेस्ट) उपयुक्त असतात. एखाद्या व्यक्तिमत्त्वाचे वरील सर्व घटक समजले की, त्यास अनुकूल क्षेत्र सुचवणे सोपे जाते.

कालावधीः सर्व चाचण्या पूर्ण करण्यासाठी किमान तीन तास व जास्तीत जास्त एक दिवस लागू शकतो. दिवसाचा कोणता कालावधी चाचण्या देण्यासाठी निवडावा हे निश्चित नसते. चाचण्या घेताना योग्य वातावरण तसेच विद्यार्थ्याची योग्य अशी मानसिक तयारी असावी लागते. विद्यार्थ्यांचे हावभाव, वर्तणूक लक्षात घेऊन त्यास अनुसरून दोन चाचण्यांमधील अंतर ठरवले जाते. घाईत किंवा अयोग्य मानसिकतेत दिलेल्या चाचण्या चुकीचा निष्कर्ष दर्शवितात. तज्ञ समुपदेशक चाचणी घेताना पूर्णवेळ हजर राहून प्रश्न समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यास आवश्यकतेनुसार सहाय्य करतात. चाचण्या ऑनलाइनदेखील उपलब्ध असतात, परंतु अशा प्रकारे चाचण्या देताना वरील महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष होते.

चाचण्यांच्या मर्यादाः समुपदेशकांनी दिलेल्या चाचण्या मानसशास्त्र्ाज्ञांनी तयार केलेल्या व जागतिक स्तरावर वापरल्या जाणाऱया स्टँडर्ड टेस्ट असल्या तरी गोंगाटाच्या परिस्थितीत दिलेल्या चाचण्या, कमी वेळात दिलेल्या चाचण्या, अयोग्य मानसिकतेत दिलेल्या चाचण्या किंवा विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन दिलेल्या चाचण्या चुकीचे निष्कर्ष दर्शवितात. बहुतांश ठिकाणी एकसारख्याच चाचण्या असतात. म्हणून एकापेक्षा जास्त वेळा त्याच चाचण्या दिल्या तर निष्कर्ष चुकीचे दर्शवू शकतात.

विश्वासार्हताः चाचण्या तयार करताना चाचणीतील प्रश्न, आकृत्या, उदाहरणे, भाषा, स्पष्टीकरणे आणि निष्कर्षदेखील तज्ञांकडून अनेकदा पडताळून पाहिलेले असतात. सर्व समुपदेशक जागतिक स्तरावर वापरल्या जाणाऱया स्टँडर्ड टेस्टस् वापरतात. शासनाकडून प्रशिक्षित झालेले समुपदेशक या चाचण्या घेतात. प्रत्येक जिह्यात आणि काही शाळांमध्येदेखील असे समुपदेशक उपलब्ध असतात. क्षमतांचा अंदाज असेल तर कार्य नक्कीच सुकर होते.

व्यवसाय मार्गदर्शक आणि समुपदेशक
[email protected]