मुद्दा – द्वेषमूलक भाषा असमर्थनीय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अनंत बोरसे

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यापासून पूर्वाश्रमीच्या राज्यकर्त्यांचा, विशेषतः गांधी – नेहरू यांच्या बदनामीचा एक कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. आजवरच्या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी त्या त्या परिस्थितीनुसार चांगले-वाईट निर्णय घेतले. देशाने, जनतेने ते स्वीकारले. मोदी असोत वा इतर कोणीही असो, शंभर टक्के कोणीच बरोबर की चूक नसतो. मात्र पूर्वाश्रमीच्या राज्यकर्त्यांवर कोणीही टीका केली नाही. अगदी अटलबिहारी वाजपेयी, व्ही. पी. सिंग यांनीदेखील. मोदी सरकारची कार्यपद्धतीच वेगळी आहे. त्यामुळेच ते कायम नेहरू-गांधी घराण्यावर सातत्याने टीका करीत आहेत. वास्तविक 60-70 वर्षांपूर्वी घडलेल्या घटना, घेतलेले निर्णय याचे भांडवल करून टीकाटिपणी करणे हे आजच्या घडीला गैरलागू आहे. त्याचे औचित्यदेखील काय? मोदी सरकारने सत्ताकारण आणि राजकारणाचे सगळेच संदर्भ बदलून टाकले आहेत. विरोधक हे जणु देशाचे शत्रू आहेत आणि आपणच काय ते देशाचे तारणहार आहोत अशी त्यांची भावना झाली आहे. आज मोदी आहेत, उद्या दुसरा कोणी देशाचे नेतृत्व करेल याचे भान या सरकारने राखले पाहिजे. अर्थात जनता या गोष्टी गांभीर्याने घेत नाही. गांधी, नेहरू वा इतर तत्कालीन नेत्यांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे. आजवरच्या देशाच्या वाटचालीसाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे हे मोदी सरकार नाकारत असले तरी देशातील जनता नाकारणार नाही. मोदी सरकारचेदेखील अनेक निर्णय चुकीचे ठरत आहेत आणि त्याची किंमत देशाला मोजावी लागत आहे. त्याची जबाबदारी कोण घेणार? इतरांच्या नावाने खडे फोडत बसण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मोदी सरकारने काम करायला हवे. विरोधकांची हेटाळणी करताना या सरकारला भान राखत नाही हे जनता बघत आहे. भक्त मंडळ वगळता हे सामान्य जनतेला रुचत नाही. मोदी सरकारने आपली मानसिकता आणि कार्यपद्धती बदलायला हवी.