
संसदेमध्ये झालेल्या घुसखोरीवरून विरोधकांनी रान उठवले असून मोदी सरकारला घेरले आहे. 13 डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण देश सुन्न झाला. ही घटना घडल्यानंतर आता पाच दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडले असून या घटनेवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
लोकसभेमध्ये 13 डिसेंबर रोजी घडलेली घटना गंभीर आहे. या घटनेवर वादविवाद करण्यापेक्षा प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते ‘दै. जागरण’शी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, संसदेमध्ये घडलेल्या घटनेचे गांभीर्य कमी लेखता कामा नये. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला या प्रकरणावर आवश्यक ती पावले उचलत आहेत. तपास यंत्रणांकडूनही या प्रकरणाचा काटेकोरपणे तपास केला जात असल्याचे मोदी म्हणाले.
या प्रकरणामागे कोणाचा हात आहे, आरोपींचा हेतू काय होता याची सखोल चौकशी आवश्यक आहे. अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी एकत्र येऊन तोडगा काढावा लागेल. त्यामुळे यावर वादविवाद आणि आरोप-प्रत्यारोप टाळावे. हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असल्याने राजकीय पक्षांनी यावर राजकारण करू नये, असे आवाहन मोदींनी केले.
संसद घुसखोरी प्रकरणात मोठे पुरावे हाती, राजस्थानमध्ये सापडले आरोपींच्या मोबाईलचे जळालेले तुकडे
संसदेत काय घडलं?
– लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरळीतपणे पार पडला. त्यानंतर झीरो अवर सुरू झाला. त्यात भाजपचे पश्चिम बंगालमधील खासदार बवेश मुर्मू हे प्रश्न उपस्थित करत असतानाच सभागृहात मोठा आवाज झाला.
-खासदारांनी मागे वळून पाहिले तर दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारल्याने सगळेच हादरले. हे तरुण थेट खासदारांच्या बाकांवर चढून घोषणा देऊ लागले. एका तरुणाने शूजमधून स्मोकबॉम्ब काढून तो पह्डला.
– सभागृहात पिवळय़ा आणि हिरव्या रंगाच्या धुराचे लोळ उठल्याने घबराट पसरली. खासदारांची पळापळ झाली. प्रचंड गोंधळ निर्माण झाला. बेफामपणे उडय़ा मारत एक आंदोलक सभापतींच्या आसनाच्या दिशेने जात होता. त्याला काही खासदारांनी घेरून पकडले.
– दोन्ही तरुणांना खासदारांनी पकडले. यावेळी एका तरुणाला चांगलाच चोप देण्यात आला. सभागृहात हल्ला झाला त्याचवेळी बाहेर त्यांच्या साथीदारांनी घोषणाबाजी करत स्मोकबॉम्ब फोडले.
– खासदार मुकुल नागर यांनी या तरुणांना अडविण्याचे धाडस दाखविले. काँग्रेसचे गटनेते अधिररंजन चौधरी, सुनील मेंढे व इतर खासदारांनी त्यानंतर या तरुणांना पकडून सुरक्षा रक्षकांच्या हवाली केले.
– धुरामुळे डोळय़ांना त्रास होत होता. स्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पीठासीन अधिकारी राजेंद्र अगरवाल यांनी कामकाज तहकूब केले.
8 कर्मचारी निलंबित
संसद भवनाच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी लोकसभा सचिवालयाने मोठी कारवाई केली आहे. लोकसभा सचिवालया सुरक्षा कर्मचाऱ्यांशी संबंधित 8 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. रामपाल, अरविंद, वीरदास, गणेश, अनिल, प्रदीप, विमित, नरेंद्र अशी या कर्मचाऱ्यांची नावे असल्याची माहिती मिळत आहे.




























































