संसद घुसखोरी प्रकरणात मोठे पुरावे हाती; आरोपींचे कपडे, बूट अन् मोबाईलचे जळालेले अवशेष जप्त

संसदेत झालेल्या घुसखोरी प्रकरणात (Parliament Security Breach) पोलिसांच्या हाती मोठा पुरावा लागला असून अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या मोबाईलचे जळालेले तुकडे राजस्थानमध्ये सापडले आहेत. दिल्ली पोलिसांनी राजस्थानमधून हे पुरावे ताब्यात घेतले आहेत.

या प्रकरणाचा मास्टरमाइंड असलेल्या ललित झा (Lalit Jha) याने सर्व आरोपींचे मोबाईल ताब्यात घेतले होते आणि त्याचे तुकडे करून सर्व मोबाईलला आगीच्या हवाली केले होते. आता जळालेल्या मोबाईलचे हे तुकडे पोलिसांच्या हाती लागल्यामुळे या प्रकरणात मोठा खुलास होण्याची शक्यता आहे.

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने संसदेतील घुसखोरी प्रकरणात राजस्थानमधून मोठे पुरावे हस्तगत केले आहेत. पोलिसांनी आरोपींच्या मोबाईलचे जळालेले अवशेष सापडले आहेत. यासह आरोपींचे बूट, कपडेही पोलिसांनी जप्त केले आहेत. यासह काही कागदपत्रांचाही समावेश आहे. घुसखोरीचे प्रकरण घडले तेव्हा ही कागदपत्र आरोपींकडे होती असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हे सर्व पुरावे पोलिसांनी जप्त केले असून अटक करण्यात आलेल्या आरोपींचीही कसून चौकशी सुरू आहे.

संसदेत काय घडलं?

– लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरळीतपणे पार पडला. त्यानंतर झीरो अवर सुरू झाला. त्यात भाजपचे पश्चिम बंगालमधील खासदार बवेश मुर्मू हे प्रश्न उपस्थित करत असतानाच सभागृहात मोठा आवाज झाला.
-खासदारांनी मागे वळून पाहिले तर दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारल्याने सगळेच हादरले. हे तरुण थेट खासदारांच्या बाकांवर चढून घोषणा देऊ लागले. एका तरुणाने शूजमधून स्मोकबॉम्ब काढून तो पह्डला.
– सभागृहात पिवळय़ा आणि हिरव्या रंगाच्या धुराचे लोळ उठल्याने घबराट पसरली. खासदारांची पळापळ झाली. प्रचंड गोंधळ निर्माण झाला. बेफामपणे उडय़ा मारत एक आंदोलक सभापतींच्या आसनाच्या दिशेने जात होता. त्याला काही खासदारांनी घेरून पकडले.
– दोन्ही तरुणांना खासदारांनी पकडले. यावेळी एका तरुणाला चांगलाच चोप देण्यात आला. सभागृहात हल्ला झाला त्याचवेळी बाहेर त्यांच्या साथीदारांनी घोषणाबाजी करत स्मोकबॉम्ब फोडले.
– खासदार मुकुल नागर यांनी या तरुणांना अडविण्याचे धाडस दाखविले. काँग्रेसचे गटनेते अधिररंजन चौधरी, सुनील मेंढे व इतर खासदारांनी त्यानंतर या तरुणांना पकडून सुरक्षा रक्षकांच्या हवाली केले.
– धुरामुळे डोळय़ांना त्रास होत होता. स्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पीठासीन अधिकारी राजेंद्र अगरवाल यांनी कामकाज तहकूब केले.

8 कर्मचारी निलंबित

संसद भवनाच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी लोकसभा सचिवालयाने मोठी कारवाई केली आहे. लोकसभा सचिवालया सुरक्षा कर्मचाऱ्यांशी संबंधित 8 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. रामपाल, अरविंद, वीरदास, गणेश, अनिल, प्रदीप, विमित, नरेंद्र अशी या कर्मचाऱ्यांची नावे असल्याची माहिती मिळत आहे.