बोईंगच्या दर्जामापन अधिकाऱ्याचा आकस्मिक मृत्यू, दोन महिन्यांत दुसरा मृत्यू झाल्याने संशय बळावला

विमाननिर्मितीत अग्रेसर असणाऱ्या बोईंग या जगप्रसिद्ध कंपनीच्या दर्जामापन अधिकाऱ्याचा (क्वालिटी ऑडिटर) आकस्मिक मृत्यू झाला आहे. अवघ्या 45 वय असलेल्या या अधिकाऱ्याच्या मृत्युने संशय बळावला आहे. कारण, अवघ्या दोन महिन्यांत हा दुसरा मृत्यू असून दोन्ही मृत्यूंची परिस्थिती संशयास्पद आहे.

या अधिकाऱ्याचं नाव जोशुआ डीन असं आहे. डीन हे बोईंग कंपनीचा पुरवठादार भाग असणाऱ्या स्पिरीट एअरोसिस्टीम या विभागात दर्जामापन अधिकारी पदावर काम करत होते. मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. अतिशय वेगाने फैलावणाऱ्या एका संक्रमणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. डीन यांच्या मृत्युच्या अवघ्या दोन महिने आधी जॉन बर्नेट या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. बर्नेट यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे.

डीन यांनी सर्वप्रथम बोईंगच्या 737 मॅक्स विमानातील स्पिरीट एअरोसिस्टिममधल्या काही महत्त्वाच्या त्रुटींना दुर्लक्षित केल्याचं म्हटलं होतं. आपल्या निरीक्षणांची नोंद त्यांनी केली होती. त्यानंतर स्पिरीटने त्यांना गेल्यावर्षी नोकरीतून काढलं होतं. ही कारवाई विमानातील त्रुटींना दाखवल्याचा सूड म्हणून करण्यात आल्याचा गंभीर आरोप डीन यांनी केला होता. तसाच आरोप डीन यांच्या मृत्युपूर्वी दोन महिने आधी आत्महत्या करणाऱ्या जॉन बर्नेट यांनीही केला होता. त्यांनी 787 ड्रीमलायनरसंबंधी सुरक्षेच्या एका त्रुटीला उघड केलं होतं. त्यांनाही नोकरीतून काढून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर डीनप्रमाणेच सूड म्हणून ही कारवाई केल्याचा आरोप बर्नेट यांनी देखील केला होता. आता दोघांचाही मृत्यू संशयास्पद पद्धतीने झाल्याने संशय बळावला आहे.