कोलंबिया विद्यापीठामध्ये पोलिसांचा वेढा

गेल्या दोन आठवडय़ां- पासून अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ सुरू असलेले आंदोलन थांबवण्यासाठी आता न्यूयॉर्क पोलिसांनी विद्यापीठाला घेराबंदी घातली आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी पोलीस आक्रमक झाले आहेत. अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. महापौर इरिक एडम्स यांनी आंदोलन थांबायला पाहिजे, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर काही तासांतच ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी बळाचा वापर करून अनेकांची धरपकड केली आहे. यासंदर्भातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडीओमध्ये पोलीस हेल्मेट आणि हातात काठय़ा घेऊन उभे असल्याचे दिसत आहे. गाझापट्टीमध्ये होणारा हिंसाचार थांबवण्याची आंदोलकांची मागणी आहे. गाझामध्ये निष्पाप लोक, लहान मुलं यांची हत्या सुरू असून ती तत्काळ थांबावी, अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे. विद्यार्थ्यांवर कठोर कारवाईचा इशारा आधीच देण्यात आला होता. तसेच विद्यापीठातून काढून टाकण्याची धमकीही विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.