लेख – शिक्षणाचा समाजोपयोगी प्रकल्प

प्रातिनिधीक फोटो

>> अजित कवटकर

शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीनिमित्त साधारण दोन महिन्यांची रजा मिळते. या कालावधीत गृहकार्य म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला सामाजिक स्तरावर किमान एक पर्यावरण संवर्धन प्रकल्प करण्याची सूचना केल्यास त्यातून घडणारे जनप्रबोधन क्रांतिकारी ठरू शकेल. सदर प्रकल्प खर्चिक नसावा. साध्या, सोप्या, सहजतेने केला जाणारा व त्याच्या पर्यावरणीय फायद्यांमुळे तो अनेकांना अनुकरणीय वाटेल असा प्रकल्प करण्याचा अट्टहास मात्र नक्कीच ठेवला जावा.

आज जगातील खूप राष्ट्रे अशी आहेत की, ज्यांची लोकसंख्या आपल्या नुसत्या विद्यार्थी संख्येपेक्षाही फार कमी आहे. तेव्हा उद्या आपला देश काय व कसा असणार आहे, हे आज या विद्यार्थी गटाला काय ज्ञान-संस्कार दिले जात आहेत त्यावर निर्भर असणार आहे. आज ज्ञानार्जन करणारी ही पिढी उद्या याच ज्ञानसामर्थ्याच्या बळावर देशाची प्रगती करणार, विकास घडविणार. जीवनाला अधिक सुखकर व सुरक्षित करण्यासाठी आपले निर्मितीक्षम योगदान देणार. परंतु आजची व्यवस्था यांना केवळ भौतिकवादाचा आपमतलबी दृष्टिकोनच प्रदान करत असल्याचे जाणवत आहे. यातून होणाऱया प्रगतीतून मात्र खऱया अर्थाने कुणाचाच व कशाचाच विकास होणार नाही.

असंवेदनशील प्रगतीच्या चाकांखाली आज नैसर्गिक शाश्वतता ज्या वेगाने चिरडली जात आहे ते पाहता या पिढीला उद्या आपल्या कौशल्याचा साक्षात्कार घडविण्यासाठी साधनसामग्री व संधी शिल्लक उरणार का? वातावरणातील बदल आज भयावह गतीने दिवसागणिक अधिकाधिक उग्र होत चालले आहेत. पण मनुष्याची त्याकडे फक्त स्वतःच्या सोयीनुसार बघण्याची उदासीनता बघता पुढे सगळेच कठीण असणार आहे. अर्थात, हे आटोक्यात ठेवता येण्यासारखे आहे. प्रत्येकाने जागरुकतेने, जाणिवपूर्वक व आग्रहाने पर्यावरणस्नेही जीवनशैलीचे कृतिशील अवलंबन केले तर या जीवनग्रहाची आणि त्यावरील जीवनाची शाश्वती टिकवून ठेवता येईल. याकामी सर्वात परिणामकारक व प्रभावी ठरू शकतो तो उद्या घडविणारा आजचा विद्यार्थी आणि त्याला तसे करण्यास प्रेरित, प्रोत्साहित करू शकते ती शिक्षण व्यवस्था.

उद्यमशील लोकसंख्या ही कोणत्याही देशासाठी सर्वात महत्त्वाचे संसाधन होय. याच उद्यमशीलतेला शालेय स्तरापासून आकार देण्यास प्रारंभ करणे आवश्यक आहे. हे असे प्रकल्प त्यादृष्टीने चांगला शुभारंभ ठरतील. उद्याच्या जगाचे तंत्रज्ञान, निर्माण प्रक्रिया, उत्पादन, सेवा हे सारे काही पर्यावरणस्नेही असणे अत्यावश्यक असणार आहे. भविष्याच्या गरजा काय असणार आहेत आणि त्या गरजांची पूर्तता आपल्या ज्ञान व कौशल्याच्या जोरावर कशी करावी, ही जिज्ञासा आजच्या विद्यार्थी वर्गात आजच प्रज्वलित केल्यास यशासाठीची ध्येयदृष्टी या वयातच त्यात निर्माण होईल. शिवाय त्या ध्येयदृष्टीत पर्यावरणस्नेही संवेदनशीलता, अनुपंपा असल्याकारणाने यात एक चांगला नागरिक घडविण्याची क्षमता असेल. स्टार्टअपला चालना देणारी ही पहिली पायरी ठरेल.

आजची खरी वास्तविकता ही आहे की, बहुतांशी मुले ही आजदेखील निकाल लागल्यानंतर पुढे काय करायचे हे ठरवतात. तसेच वातावरण बदल आणि तापमान वाढ या समस्यांना काय कारणीभूत आहे व त्याचे निवारण कसे करणे शक्य आहे याचीदेखील यांना सुतराम कल्पना नाही. सहलीसाठीच बहुधा यांना वन्य जीवसृष्टी पाहिजे असते. त्यापलीकडे आज पर्यावरणाचा कशा प्रकारे ऱहास होत आहे आणि त्याला आपणदेखील कसे थोडय़ा प्रमाणात कारणीभूत आहोत याचाही गंध नाही. त्यामुळे हे असे प्रकल्प त्यांच्यावर सातत्याने लादल्यास कालांतराने त्यांचा या विषयावरील अभ्यास व आवड वाढेल. यातून करीअर घडविणाऱया व्यवसाय संधी निर्माण होतील. मनुष्यबळ हे अशा प्रकारे पर्यावरण रक्षणाला सहाय्यकारी ठरत स्वतःची व राष्ट्राची प्रगती साधेल. पर्यावरणपूरक विचारांची ही अशी निसर्गस्नेही परिसंस्था निर्माण करण्याचे सामर्थ्य केवळ शिक्षणातच आहे आणि विद्यार्थीदशेतच ते निर्माण करता येणे अधिक सुलभ आहे.

उन्हाळय़ाच्या सुट्टीत गावी जाणे ही बहुतेकांसाठी जणू परंपराच होय. अशा मोकळेपणात आपण निसर्गाकडे आकर्षिले जाणे स्वाभाविकच. वन्य जीवांच्या सहवासात त्यांच्याप्रति सहानुभूती निर्माण होतेच. मग ते अधिक समृद्ध करण्यासाठी वृक्षारोपणाहून अधिक सुंदर व साधे काय असू शकेल! पावसाचे पाणी जमिनीत जिरवून त्याची साठवणूक करण्यासाठी अनेक छोटे-छोटे रेनवॉटर हार्वेस्टिंग तंत्र आहेत, ज्यामधील एखादा त्या जागेच्या कार्यक्षमतेला व नैसर्गिकतेला धक्का न लावता करता येण्यासारखा असल्यास करावे. ओल्या कचऱयापासून सेंद्रिय खताची निर्मिती करणे. मृदेची गुणवत्ता वाढविणे. एखाद्या जल स्रोताची स्वच्छता करणे. वेस्ट टू वेल्थ या संकल्पनेतून टाकाऊ पदार्थांना उपयोगिता व मूल्य बहाल करणे. ‘Repair – Reuse – Recycle – Refuse’ला अनुसरून संसाधनांची बचत करणे. कापडी पिशव्या बनवणे. निकामी पकडलेल्या एखाद्या गलिच्छ भागात बाग फुलवून ती सुशोभित करणे. पक्ष्यांसाठी एक सुरक्षित आसरा तयार करणे. सौर व पवन ऊर्जेवर चालणारी उपकरणे तयार करणे. वह्यांमधील शिल्लक कोरी पाने जमा करून बुकबाईंडिंग करणे. पाणी, वीज, इंधन वाचविणाऱया जीवनशैलीचे नियोजन करून ते स्वतःसहित इतरांनाही स्वीकारण्यास प्रेरित करणे. या व अशा प्रकारच्या अगणित पर्यायांवर प्रकल्प म्हणून कृतिशील कार्य करता येण्यासारखे आहे. यामुळे सुट्टीचा वेळ तर सदुपयोगी ठरेलच, पण यातून बरेच काही शिकता येण्यासारखे आहे, जे एरवी मोबाईल व टीव्हीच्या व्यसनाधीनतेमुळे करणे विद्यार्थ्यांना शक्य होत नाही.

मानवाने ऋतूचक्र बदलले. हवामान अनपेक्षित बनवले. अनवधानाने का होईना, पण आजचे क्लायमेट क्रायसिस हे आपल्याच असंवेदनशील, स्वार्थी कर्मांचे फलित आहे, याची जाणीव त्याला स्वतःलादेखील झाली आहे. परंतु ‘मीच का?’ ची मुजोरी त्याला पर्यावरणला घातक सवयी व पद्धतींपासून फारकत घेण्यापासून परावृत्त करत आहे. आपण सारे काही फिक्स करू शकतो हा अहंकारी, विनाशकारी आत्मविश्वास यात अधिक भर घालत आहे. परंतु आज आपण अशा स्थितीत येऊन पोहोचलो आहोत की, आजपर्यंतच्या पिढय़ांनी पर्यावरणाची केलेली अपरिमित हानी ही कदापि भरून काढता येऊ शकत नाही. तसेच त्यापासून होऊ घातलेल्या संकटांनादेखील नाही रोखता येणार आहे. पण त्यांची गती, सातत्य व तीव्रता मात्र खूप कमी करता येण्यासारखी आहे. जर आपली प्रत्येक कृती पर्यावरणाबाबत जागरूक राहिली, तर याच उद्दिष्टाने सामाजिक मानसिकता बदलण्यातच भविष्य आहे. म्हणूनच जे उद्याचे भविष्य असणार आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये आतापासूनच पर्यावरणस्नेही संस्कारांचे बिजारोपण करणे अपरिहार्य आहे. अगदी बालवयापासूनच त्यांचा स्वभाव व सवयी या निसर्ग, पर्यावरणाला पोषक असणाऱया करण्याकडे जाणिवपूर्वक भर देणे आवश्यक आहे. शालेय अभ्यासक्रमातून याबाबतची जबाबदारी व कर्तव्ये मनामनावर ठासवता येण्यासारखी आहेत. येणाऱया उन्हाळी सुट्टीपासूनच याचा श्रीगणेश करणे छान ठरेल. प्रत्येक शाळा, महाविद्यालयाने याबाबतची कृती योजना व रूपरेखा तयार करून तसे निर्देश दिल्यास शिक्षणाचा हा समाजोपयोगी प्रकल्प पर्यावरणाची स्वच्छ क्रांती घडवेल आणि भविष्य शाश्वत, सुंदर, समृद्ध करेल.

[email protected]