
यंदाच्या बारावीच्या निकालातही सायन्स शाखेचा दबदबा कायम असून सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेल्या या शाखेचा निकालही सर्वाधिक 97.82 टक्के इतका लागला आहे. राज्यातील तब्बल 2,247 ज्युनियर कॉलेजचा 100 टक्के, तर 21 कॉलेजचा निकाल शून्य टक्के लागला आहे.
सायन्स शाखेतील जे विद्यार्थी जेईई, नीट परीक्षा देणार आहेत, अशा विद्यार्थ्यांची गुण पडताळणी, पुनर्मूल्यांकन तातडीने करण्याच्या सूचना सर्व विभागीय मंडळांना देण्यात आल्या आहेत.
सायन्स शाखेतून परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांची संख्या यंदा वाढली असून 7 लाख 27 हजार 386 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 7 लाख 25 हजार 77 विद्यार्थांनी परीक्षा दिली. त्यापैकी 7 लाख 9 हजार 314 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल 97.82 टक्के लागला आहे, तर आर्टस् शाखेतून परीक्षा दिलेल्या 3 लाख 51 हजार 145 विद्यार्थांपैकी 3 लाख 1 हजार 566 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 85.88 टक्के एवढी आहे. कॉमर्स शाखेतून 3 लक्ष 7 हजार 887 विद्यार्थांनी परीक्षा दिली. त्यामधून 2 लाख 83 हजार 818 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा एकूण निकाल 92. 18 टक्के लागला आहे.
शाखानिहाय निकाल (टक्केवारी)
शाखा परीक्षेला बसलेले उत्तीर्ण टक्केवारी
आर्टस् 3,51,145 3,01,566 5.88
कॉमर्स 3,07,878 2,83,818 92.18
सायन्स 7,25,077 7,09,314 97.82
व्यवसाय 35,106 30,808 87.75
अभ्यासक्रम
आयटीआय 4764 4178 87.69
नागपूर विभागाचा निकाल 92.12 टक्के
बारावी नागपूर विभागाचा निकाल 92.12 टक्के लागला आहे गेल्यावर्षीच्या तुलनेत पावणेदोन टक्क्याने निकालात वाढ झाली असली तरी यंदाही विभागाने आठवे स्थान कायम ठेवले आहे. मुलींनी बाजी मारली आहे. मुलींची टक्केवारी 94.46 आहे.
गोंदिया पुन्हा आघाडीवर
गोंदियाने 95.24 टक्क्यासह प्रथम स्थान पटकाविले आहे. यापाठोपाठ भंडारा जिह्याने एका स्थानात सुधारणा करीत, 94.68 टक्क्यासह दुसरा तर गडचिरोली जिह्याची एका स्थानावर घसरण होत, 94.42 टक्क्यासह तिसरा स्थान पटकाविला आहे. नागपूरने 89.93 टक्क्यासह पाचवे तर वर्धा जिह्याने 89.40 टक्क्यासह सहावे स्थान पटकाविले.
सात दिवसांनी गुणपत्रिका
बारावीच्या निकालानंतर प्रथम वर्षाच्या प्रवेशाला सुरुवात होत असल्याने त्यासाठी गुणपत्रिका महत्त्वाची असते. त्यामुळे निकालानंतर सात दिवसांनी बारावीची गुणपत्रिका मिळणार आहे. यावेळी बुधवारपासून फेरमूल्यांकनासाठी अर्ज देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. 6 जूनपर्यंत विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्यात येईल. त्यानंतर झेराक्स, गुणपडताळणीस सुरुवात होईल.





























































