…मग तुम्ही त्यांना 10 वर्षे तुरुंगात ठेवणार का? सुनिता केजरीवाल यांचा परखड सवाल

कथित मद्य घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची मैदानात उतरल्या आहेत. सुनिता केजरीवाल यांनी गुरुवारी गुजरातमधील भावनगरमध्ये इंडिया आघाडीचे उमेदवार उमेश भाई मकवाना यांच्यासाठी रोड शो केला. यावेळी त्यांच्यासोबत भावनगरचे आपचे उमेदवार उमेश मकवाना आणि आपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष इशुदान गढवी उपस्थित होते.

गुजरातमधील या रोड शो दरम्यान सुनिता यांनी नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी सुनिता केजरीवाल म्हणाल्या, “माझ्या नवऱ्याला बळजबरीने तुरुंगात टाकण्यात आले आहे. याबाबात अद्याप तपास सुरू असल्याचे बोलले जात आहे. पुढील तपास 10 वर्षे चालला तर त्यांना 10 वर्षे तुरुंगात ठेवणार का? पूर्वी एखादी व्यक्ती दोषी सिद्ध झाल्यावरच तिला तुरुंगात पाठवायचे. मात्र आता कायदे आणि नवीन व्यवस्था सुरू केली असून खटला सुरू होईपर्यंत त्याला तुरुंगात ठेवणार आहे. ही निव्वळ गुंडगिरी आहे. हुकूमशाही आहे. केजरीवालजी खरे देशभक्त, प्रामाणिक आणि सुशिक्षित आहेत.”

‘अरविंद केजरीवाल यांनी समाजसेवा करण्यासाठी आयआरएसची नोकरी सोडली. दिल्लीच्या जनतेने त्यांना तीनदा मुख्यमंत्री म्हणून निवडून दिले. गुजरातच्या जनतेने आम आदमी पक्षाचे पाच आमदार निवडून दिले. संपूर्ण देशातील जनता अरविंद केजरीवाल यांच्यावर प्रेम करते. हे जनतेचं प्रेम भाजपला पाहावलं नाही. म्हणूनच त्यांनी खोट्या गुन्ह्यात त्यांना तुरुंगात टाकलंय. मात्र ते लवकरच यातून बाहेर येतील’, असे सुनिता केजरीवाल पुढे म्हणाल्या.

अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी ईडीने कथित मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. सध्या ते तिहार तुरुंगात आहेत. केजरीवाल तुरुंगात गेल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनिता यांनी पक्षाच्या कामाची जबाबदारी घेतली आहे. मात्र, केजरीवाल हेच मुख्यमंत्री राहतील आणि ते तुरुंगातूनच सरकार चालवतील, असे आम आदमी पक्षाने वारंवार स्पष्ट केले आहे.